
UPI Loan Without Interest: डिजिटल पेमेंटच्या जगात युपीआय धमाका करण्यासाठी सज्ज आहे. आता युपीआयच्या फीचर्समुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल. युपीआयच्या माध्यमातून छोटे कर्ज सहज उपलब्ध होईल. तर ते वसूल करण्याची पद्धत लवचकी असल्याने क्रेडिट कार्ड कंपन्यांचं दुकान बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. छोट्या छोट्या कर्जासाठी क्रेडिट कार्ड ग्राहकांना एक अथवा सव्वा महिन्यांची सवलत देतात. त्यानंतर मात्र अव्वाच्या सव्वा व्याज वसूली सुरू होते. चक्रवाढ व्याजाने ही रक्कम वसूल करण्यात येते. बँका आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) दरम्यान चर्चा यशस्वी ठरली तर आता युपीआयवर सहज कर्ज मिळेल. तर या कर्जावर एका मर्यादीत काळासाठी व्याज आकारण्यात येणार नाही. हे फीचर्स क्रेडिट कार्ड कंपन्यांप्रमाणेच असल्याने ग्राहकांना युपीआयचा मोठा आधार होईल. सध्या काही युपीआय प्लॅटफॉर्म काही बँकांना हाताशी धरत एफडीवर क्रेडिट कार्ड अथवा इतर गुंतवणुकीवर क्रेडिट कार्ड देतात. विशेष म्हणजे या कार्ड आधारे खरेदी केल्यास कॅशबॅकचा फायदा होतो. आता कर्ज मिळण्याची सुविधा या प्लॅटफॉर्ममार्फत उपलब्ध झाल्यास क्रेडिट कार्डची गरज कमी होईल.
युपीआय क्रेडिट लाईन
लोकांमध्ये अजून युपीआय क्रेडिट लाईन अजून तितकी लोकप्रिय झालेली नाही. त्यामागे व्याजावर आधारीत प्रणाली आहे. जेव्हा एखादा युझर या सुविधेचा वापर करून पेमेंट करत होता. त्याचवेळेपासून सदर रक्कमेवर व्याज लागू होत होते. जेव्हा युपीआय क्रेडिट लाईन आधारे एखादी व्यक्ती कर्जाऊ रक्कम घेत होती. तेव्हा त्या रक्कमेवर लागलीच व्याजाची आकारणी सुरु होत होती. त्यामुळे क्रेडिट कार्ड लोकांना फायदेशीर वाटत होते. कारण क्रेडिट कार्डवर महिना अथवा सव्वा महिना रक्कम वापरता येते आणि मर्यादित वेळेत ती रक्कम जमा करता येते. त्यानंतर मात्र चक्रवाढ व्याज लागू होते.
काय आहे नवीन प्लॅन?
NPCI च्या नवीन प्लॅननुसार युपीआय क्रेडिट लाईनमध्ये आता क्रेडिट कार्डप्रमाणेच ग्रेस पीरियड मिळेल. या कालावधीत ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही. तर ठराविक मुदतीत ही रक्कम ग्राहकाला परतफेड करावी लागेल. म्हणजे क्रेडिट कार्डप्रमाणेच या क्रेडिट लाईनचा उपयोग होईल. म्हणजे क्रेडिट लाईन आधारे ग्राहकांना बिल अथवा इतर वस्तूंसाठी खर्च करता येईल. एका मुदतीसाठी ही रक्कम वापरता येईल. त्या रक्कमेवर व्याजही द्यावे लागणार नाही आणि ही रक्कम परत करता येईल. त्यावर त्यांना वेगळे अथवा अतिरिक्त शुल्क अदा करावे लागणार नाही.
काही बँकांनी अगोदरच सुरू केली सुविधा
ही सुविधा काही बँकांनी अगोदरच सुरू केली आहे. यस बँकेने युपीआय क्रेडिट लाईनवर 45 दिवसांपर्यंत विना व्याज रक्कम परत करण्याची सुविधा दिली आहे. तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने पण 30 दिवसांपर्यंत व्याज मुक्त कालावधी ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. तर काही बँकांनी एक मोठी रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवायची. त्यावर मुदत ठेवीचे व्याज आणि बचत म्हणून व्याज देण्याचा तसेच क्रेडिट कार्डवर कॅशबॅक देण्याचा धमाका पण सुरू केला आहे. काही प्लॅटफॉर्म याविषयीचे प्रयोग करत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात क्रेडिट कार्ड कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभं ठाकण्याची शक्यता आहे.