’10 हजार कोटींचे नुकसान’, दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधी यांना खुले पत्र
CTI Letter to Rahul Gandhi: दिल्लीतील रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसने महारॅली आयोजित केली आहे. त्यावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे.

CTI Letter to Rahul Gandhi: दिल्लीतील रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसने पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. या दिवशी महारॅलीचे आयोजन केले आहे. यानंतर आता दिल्लीतील व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. व्यापारी आणि उद्योजकांची शिखर संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (CII) लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना थेट पत्र धाडलं आहे. सणासुदीत होणारे हे आंदोलन स्थगित करण्याची मागणी केली आहे.
व्यापाराला मोठा फटका?
CTI अध्यक्ष बृजेश गोयल यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. “आम्हाला माहिती मिळाली आहे की, तुमचा पक्षा हा 1 नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर महारॅली आयोजित करणार आहे. तुम्हाला नम्र विनंती आहे की, ही रॅली आगामी 10 नोव्हेंबरपर्यंत स्थगित करावी. याच कालावधीत दिवाळी आहे आणि व्यापाऱ्यांसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे.”
25 हजार कोटींचा सणासुदीतील व्यापार
या पत्रानुसार, यावर्षी धनत्रयोदशी 6 नोव्हेंबर रोजी आहे. दीपावली, दिवाळी 8 नोव्हेंबर रोजी आहे. तर भाऊबीज ही 10 नोव्हेंबर रोजी आहे. लोक एक आठवड्यापूर्वीपासूनच दिवाळीची खरेदी सुरू करतात. धनत्रयोदशीसाठी दिल्लीतील सर्वच विभागात, सोने आणि चांदी, भांडीकुंडी, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, ड्राय फ्रुट्स, मिठाई, ऑटोमोबाईल, वाहनं, घर खरेदी, इतर वस्तूंची खरेदी करतात. यामुळे जवळपास 25 हजार कोटींचा व्यवसाय होतो. हा व्यापार दिल्लीतील अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
3 हजार कोटींचे अगोदरच नुकसान
CTI च्या दाव्यानुसार, कॅनॉट प्लेस, इंडिया गेट आणि मध्य दिल्लीतील आंदोलनं, रॅली, प्रदर्शनं, मार्च यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. सुरुवातीलाच जवळपास 3 हजार कोटी रुपयांचा फटका बसला. ठोक व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. बाजारात माल आणणे कठीण झाले होते. तर सर्वसामान्य ग्राहकही याकाळात फारसा फिरकला नाही. CTI चे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी एक व्हिडिओ शेअर केला. त्यात रामलीला मैदानाच्या 5 किमी परिसरात दिल्लीतील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध होलसेल आणि किरकोळ बाजार आहे. यामध्ये चांदणी चौक, सदर बाजार, चावडी बाजार, भागीरथ पॅलेस, खारी बावली, कश्मिरी गेट, नया बाजार, मोरी गेट, किनारी बाजार, दरीबा, दरिया गंज, अजमेरी गेट, जामा मशिद, झंडेवालान, करोल बाग, नबी करीम, आझाद मार्केट आणि लजपत राय मार्केटचा समावेश आहे. या ठिकाणाहून संपूर्ण भारतात माल पाठवला जातो. आता अजून आंदोलन झाल्यास नुकसानीचा आकडा दहा हजार कोटींच्या घरात जाण्याचा दावा करण्यात येत आहे.
