देशाचा GDP किती वाढणार? एसबीआयने केला खुलासा; भारताची कामगिरी RBIच्या अंदाजांच्याही पलीकडे!
एसबीआय रिसर्चच्या अंदाजानुसार, वाढत्या किमतींमुळे नॉमिनल जीडीपी वाढीचा दर वाढून ११.५% होईल. एसबीआयचे हे अंदाज नेमके काय आहेत, हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.

एसबीआय रिसर्चने एक मोठी शक्यता वर्तवली आहे. त्यांच्यानुसार जुलै-सप्टेंबर या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ७.८% दराने वाढण्याची शक्यता आहे. एसबीआयचा अंदाज हा मागील तीन महिन्यांतील विकास दरांच्या बरोबरीचा आहे. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ७.२% च्या अंदाजापेक्षा अधिक आहे. हा अंदाज कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांशी संबंधित ५४ ‘हाय-फ्रिक्वेन्सी इंडिकेटर्स’वर आधारित आहे. अहवालानुसार, तिमाहीच्या उत्तरार्धात सिमेंट उत्पादन, व्यावसायिक वाहनांची विक्री, तेल-व्यतिरिक्त निर्यात आणि बंदरांमार्फत होणारी मालवाहतूक यामध्ये वाढ दिसून आली आहे.
दरम्यान, खाणकाम उत्पादन, ट्रॅक्टर विक्री आणि विमानतळांवरील प्रवासी संख्येत घट दिसून आली. जून महिन्यात तर ११.९ टक्क्यांनी वाढलेली ट्रॅक्टर विक्री सप्टेंबरमध्ये तब्बल १८.१ टक्क्यांनी घसरली. याच कालावधीत, १ टक्क्याच्या दराने वाढणारे खाणकाम उत्पादन आता ६.२ टक्क्यांच्या घसरणीवर दिसून आले आहे.
नॉमिनल वाढीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा?
नॉमिनल जीडीपी एक पॉझिटिव्ह माहिती आली असून त्यामध्ये ११ ते ११.५% दराने वाढण्याचा अंदाज आहे. या आधी जून तिमाहीत ही वाढ १०.३% इतकी नोंदवण्यात आली होती. एसबीआय रिसर्चच्या मते, जुलै-सप्टेंबर या कालावधीत कृषी उत्पादनांच्या किमती सरासरी सुमारे ७.८% नी वाढल्या आहेत, तर एप्रिल-जून तिमाहीत ही वाढ ४.९५% होती. दुसरीकडे, कृषी आणि संबंधित क्षेत्रांमधील रिअल ग्रोथ ३.६% वरून घसरून २.८% वर येण्याची शक्यता आहे.
उत्पादन आणि सेवा क्षेत्रे
एसबीआय रिसर्चने उत्पादन क्षेत्रातील ‘डिफ्लेटर’ १.१% इतका असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याचा अर्थ असा की, उत्पादन क्षेत्रातील रियल ग्रोथ ८.७% आहे, तर नॉमिनल ग्रोथ ७.६% इतकी आहे. अहवालानुसार, अनेक उत्पादन क्षेत्रांमध्ये कच्च्या मालाच्या किंवा इनपुटच्या किमती, उत्पादित वस्तूंच्या किमतींपेक्षा अधिक होत्या. यावरून असे दिसून येते की, उत्पादकांनी खर्चाचा भार ग्राहकांवर केवळ अंशतःच टाकला आहे. सेवा क्षेत्रातील वाढ मागील तिमाहीतील १०% वरून घसरून ९.७% होण्याचा अंदाज आहे. एसबीआय रिसर्चच्या मॉडेलनुसार, आर्थिक वर्ष २०२७ च्या शेवटच्या दोन तिमाहीत एकूण ‘रियल जीडीपी वाढ’ आणखी मंदावून सुमारे ६.९ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते.