कर कपातीला विरोध, पेट्रोल पंपचालकांचा आज ‘नो पर्चेस डे’; राज्यात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा

| Updated on: May 31, 2022 | 10:32 AM

पेट्रोल, डिझेलवरील एक्साइज ड्युटीमध्ये करण्यात आलेल्या कपातीचा पेट्रोल पंप चालकांकडून निषेध करण्यात येत आहे. आज याविरोधात नो पर्चेस डेची घोषणा करण्यात आली आहे.

कर कपातीला विरोध, पेट्रोल पंपचालकांचा आज नो पर्चेस डे; राज्यात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा
पेट्रोल-डिझेलचे दर
Follow us on

मुंबई : देशात महागाईचा (Inflation) भडका उडला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल (Petrol), डिझेलपासून खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. दरम्यान वाढत्या इंधन दरापासून जनतेला दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या एक्साइज ड्युटीमध्ये कपात करण्यात आली. एक्साइज ड्युटीमध्ये कपात करण्यात आल्याने पेट्रोल लिटरमागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राकडून एक्साइज ड्युटीमध्ये कपात करण्याची ही दुसरीवेळ आहे. यापू्र्वी चार नोव्हेंबर 2021 रोजी देखील केंद्रकडून एक्साइज ड्युटीमध्ये कपात करण्यात आली होती. दरम्यान केंद्राकडून अचानक कमी करण्यात आलेल्या एक्साइज ड्युटीचा पेट्रोल पंपचालक आणि मालकांकडून विरोध होत आहे. यामुळे आम्हाला मोठे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचाच निषेध करण्यासाठी आज पेट्रोल पंप चालकांकडून नो पर्चेस डेचं आवाहन करण्यात आले आहे.

कर कपातीला विरोध

राज्यभरातील पेट्रोल पंपचालक, मालक या संपामध्ये सहभागी होणार आहेत. पेट्रोल पंपचालक कमी करण्यात आलेल्या एक्साइज ड्यूटीचा निषेध करण्यासाठी आज तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलची खरेदी करणार नाहीयेत. सोमवारी जेवढा साठा शिल्लक राहिला होता, तेवढ्याच इंधनाची आज विक्री करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक पेट्रोल पंप आज बंद राहण्याची शक्यता आहे. केंद्राने अचानक कर कमी करण्याचा निर्णय घेतला. निर्णयापूर्वी चर्चा करणे आवश्यक होते. जेव्हा एक्साइज ड्युटी कमी झाली, त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही पेट्रोल, डिझेलचा मोठा साठा खरेदी केला होता. मात्र अचानक एक्साइज ड्यूटी कमी झाल्याने आम्हाला पेट्रोल, डिझेल स्वस्तात विकावे लागल्याचे डिलर्सनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत मागण्या?

आपल्या विविध मागण्यांसाठी आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालकांकडून घेण्यात आला आहे. कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. इंधन विक्रेत्यांना एक लिटर पेट्रोल मागे 2.20 रुपये तर प्रति लिटर डिझेल मागे 1.80 रुपये कमिशन मिळते. कमिशनमध्ये शेवटची वाढ ही 2017 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर कमिशन वाढवण्यात आलेले नाही. मात्र महागाई मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात येत आहे.