शक्ती कपूरचे सोन्याविषयी 35 वर्षांपूर्वीचे ते भाकीत; मग आताच का होतंय Viral; युझर्स म्हणाले, आई-वडिलांनी त्याचवेळी खरेदी केली असती तर…

Shakti Kapoor Gold Price Prediction : शक्ती कपूरचे सोन्याविषयीचे 35 वर्षांचे भाकीत सध्या समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. अनेक युझर्संनी त्या Viral Video वर धमाल प्रतिक्रिया दिल्या आहेत. काय आहे ते नंदू, सबका बंधूचे ते भाकीत

शक्ती कपूरचे सोन्याविषयी 35 वर्षांपूर्वीचे ते भाकीत; मग आताच का होतंय Viral; युझर्स म्हणाले, आई-वडिलांनी त्याचवेळी खरेदी केली असती तर...
शक्ती कपूर सोन्याच्या किंमतीविषयी भाकीत
| Updated on: Oct 22, 2025 | 3:26 PM

Gold Rate Viral Video of Shakti Kapoor : आज सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. ऐन दिवाळीत सोने 1 लाख 31 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घरात पोहचले आहे. यावर्षात सोन्याची किंमत 60 टक्क्यांहून अधिकने भडकली आहे. 2014 मध्ये सोन्याचा भाव 28 ते 32 हजार रुपये तोळा होता. गेल्या दहा वर्षात सोन्याने मोठी झेप घेतली आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे सोन्याचा ग्राहक घटला आहे. काही तज्ज्ञांच्या मते सोने लवकरच दीड लाखांचा टप्पा पार करेल. पण सोने एक लाखांचा टप्पा पार करेल हे भाकीत शक्ती कपूर यांनी केले होते. अर्थात हा चित्रपटातील संवाद होता. पण त्यांचा हा डायलॉग सध्या एकदम लोकप्रिय झाला आहे.

शक्ती कपूरची सोन्याच्या भावाविषयीचे भाकीत ठरले खरे

35 वर्षांपूर्वी शक्ती कपूर यांनी एका चित्रपटात सोन्याच्या किंमतीविषयी भाकीत केले होते. त्यांचा अंदाज आज खरा ठरला. त्या चित्रपटाची एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यात शक्ती कपूर यांच्या डायलॉगची चर्चा होत आहे. ‘एक दिवस आपल्याकडील सोन्याचा भाव वाढेल. 5 हजार रुपये तोळा, 10 हजार रुपये तोळा, 50 हजार रुपये तोळा, लाख रुपये तोळा’ हा त्यांचा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. शक्ती कपूर यांचे भाकीत खरं ठरल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

अनेक जण सोशल मीडियावर या क्लीपवर कमेंट करत आहेत. त्याचवेळी आई-वडिलांनी शक्ती कपूर यांचे म्हणणे मनावर घेतले असते तर आजच आपण कोट्याधीश झालो असतो. आपल्याकडे एक किलो सोने असते. तर त्याची किंमत किती असेल या विचारानेच काहींनी आपल्याला भोवळ आल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे. या एकाच डायलॉगच्या अनेक क्लिप सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

सोन्याची किंमत जाणून घ्या?

goodreturns.in नुसार, 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यात 17 ऑक्टोबर रोजी 333 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर 1 ग्रॅम सोन्यात अनुक्रमे 191 रुपये, 17, 11 आणि 338 रुपयांची मोठी घसरण झाली. 1 लाख 31 हजार 001 रुपयांहून सोने आज थेट 1 लाख 27 हजार 350 रुपयांपर्यंत घसरले. गुडरिटर्न्सनुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 27 हजार 350 रुपये इतका झाला. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 16 हजार 750 रुपये असा आहे.

चांदीत घसरणीचा इतिहास

चांदीने या वर्षी इतिहास रचला. एक किलो चांदी 1 लाख 85 हजारांच्या घरात पोहचली होती. पण गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले घसरणीचे सत्र थांबलेले नाही. 28 हजारांनी चांदीचा भाव आपटला आहे. 18 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात चांदीत 13 हजारांची महा घसरण झाली. त्यानंतर अनुक्रमे 8 हजार, 2 हजारांची घसरण नोंदवली गेली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आज 1,62,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदी घसरली. 22 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,23,910 रुपये, 23 कॅरेट 1,23,410, 22 कॅरेट सोने 1,13,500 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 92,930 रुपये, 14 कॅरेट सोने 70,490 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,63,050 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.