पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीपूर्वीच अमेरिकेचा मोठा ‘खेला’; लागला की जिव्हारी घाव

Donald Trump Big Decision : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या यात्रेवर आहेत. त्यांची आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दिलखुलास भेटीचे चित्र माध्यमांवर झळकले. पण त्यापूर्वीच अमेरिकेने भारतासोबत मोठा खेला केला. त्यामुळे देशातील काही वस्तू महागण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीपूर्वीच अमेरिकेचा मोठा खेला; लागला की जिव्हारी घाव
ट्रेड वॉर
| Updated on: Feb 14, 2025 | 10:21 AM

Trump Reciprocal Tariffs : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी मोदींची मुक्तकंठाने प्रशंसा केली. या दोन मित्रांच्या भेटीने चीनला मिरच्या लागल्या असतीलही. पण त्यापूर्वी अमेरिकेने भारताला मोठा हाबाडा दिला. ट्रम्प यांनी गुरूवारी मोठा निर्णय घेतला. त्यामुळे आता Trade War भडकण्याची दाट शक्यता आहे. अमेरिका शत्रू राष्ट्रच नाही तर मित्रांच्या आयात मालावर शुल्क आकारण्याची घोषणा त्यांनी केली. ज्या देशांनी यापूर्वी अमेरिकेच्या मालावर भरमसाठ शुल्क आकारले, त्या सर्वांना धडा शिकवण्याचे सुतोवाच त्यांनी अगोदरच केले होते. या निर्णयामुळे काही वस्तू भारतात महागण्याची तर अमेरिकेतील महागाईत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अमेरिका आकरणार शुल्क

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्यापारी प्रतिनिधी आणि वाणिज्य सचिवांची बैठक घेतली. त्यात त्यांनी प्रत्येक देशासाठी वेगवेगळ्या शुल्काचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, शत्रू राष्ट्राच्या मालावर जास्तीचे शुल्क तर यावेळी ज्या मित्रांनी अमेरिकेच्या मालावर अधिक कर आकारला, त्यांच्यावर सुद्धा शुल्क आकारण्याचे निर्देश दिले.

व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, या प्रक्रियाला अजून काही दिवस लागतील. काही महिन्यात याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थात हे शुल्क कधी लागू होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पण नाव घेतले. भारतावर सुद्धा आगपाखड केली. भारत हा जगातील जवळपास प्रत्येक देशाकडून जास्त शुल्क आकारतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर आता आम्ही सुद्धा भारतावर शुल्क लावणार असल्याचे ते म्हणाले.

भारतावर होणार थेट परिणाम

नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच ट्रम्प यांनी भारताच्या भूमिकेवर आगपाखड केली. ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी हे शुल्क आकारले जाणार आहे. त्याचा थेट परिणाम देशाच्या व्यापारावर दिसेल. अनेक व्यापारी करार यामुळे प्रभावित होतील. विशेषतः आयटी, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रावर परिणाम होईल.

काय म्हणाले ट्रम्प?

“मी निष्पक्ष निर्णय घेतला आहे. आता मी पण शुल्क आकारून प्रत्युत्तर देणार आहे. जे पण देश अमेरिकेवर शुल्क आकारतात. त्यांच्यावर पण तसेच शुल्क आकारले जाईल. जवळपास सर्वच बाबतीत हे देश आमच्याकडून शुल्क आकारत आहेत. पण आता ते दिवस गेलेत. त्यांनी शुल्कासाठी तयार असावे.” असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले. तर हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल आणि इतर अमेरिकन सामनावर भारताने लावलेल्या करावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.