Kalyan : मराठी माणसाला मारहाण, दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मुख्य आरोपी शुक्ला…

कल्याणमधील अजमेरा हाईट्समध्ये मराठी कुटुंबावर झालेल्या बेदम मारहाणी प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध केला असून मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे स्पष्ट केले आहे.

Kalyan : मराठी माणसाला मारहाण, दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मुख्य आरोपी शुक्ला...
kalyan crime
| Updated on: Dec 20, 2024 | 3:06 PM

कल्याण पश्चिमेकडील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स इमारतीमध्ये एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाने बेदम मारहाण केल्याचं प्रकरण काल समोर आलं असून त्यामुळे राज्यातील वातावरण अतिशय तापलं आहे. मुंबईत, महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसांना अतिशय तुच्छ वागणूक देणारे अनेक प्रकार यापूर्वीही घडले असून कालच प्रकार तर अक्षरश: कळस होता. दोन कुटुंबांमधला वाद सोडवण्यास गेलेल धीरज देशमुख यांना उलट मारहाण करण्यात आली. त्यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी रॉडनेही हल्ला करण्यात आला. याप्रकरणाने मोठा गदारोळ माजला असून त्याचे पडसाद आजच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले.

आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली असून मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कल्यामधील खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सुमित जाधव आणि दर्शन बोराडे अशी त्यांची नावे आहेत. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी, अखिलेश शुक्ला हा अजूनही फरार असून त्याच्यासह इतर आरोपींचाही पोलिस कसून शोध घेत आहेत.

काय म्हणाले पोलिस ?

मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून मारहाण करणाऱ्या सुमित जाधव, दर्शन बोराडे या दोन आरोपींना ताब्यात घेतंल आहे. सोशल मीडियावर फिरणारे काही व्हिडीओ आमच्याकडे आले, तसेच आणखीही काही व्हिडीओ मिळाले आहेत. याप्रकरणी आम्ही कारवाई करत आहोत, कोणालाही सोडणार नाही. जो गुन्हा दाखल करण्यातआला , त्याची तपासणी करू. संबधित पोलिस अधिकारी लांडगे याच्यविरुद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत या विषयी एसीपी तपास करत आहे. त्या रात्री जी घटना घडली त्याचा तपास करताना ज्यांनी दिरंगाई केली असेल त्यांच्यावर कारवाई करणार असे आश्वासन पोलिसांनी आहे.

कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केले.

कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम 289 अन्वये चर्चेला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ऍड. परब, शशिकांत शिंदे, अरुण उर्फ भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे.

महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येथे येत असते आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तम पणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले. एखाद्याने काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अश्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट बजावले. देशातील वैविध्य टिकले पाहिजे, आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

काय घडलं होतं ?

कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल सोसायटीत दोन अमराठी कुटुंबियांमध्ये भांडण सुरु होतं. तो वाद मिटवण्यासाठी शेजारी राहणारे  धीरज देशमुख या मराठी कुटुंबातील व्यक्तीने हस्तक्षेप केला. यावेळी धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खाऊन घाण करता,  अशी शेरेबाजी केल्याने हा वाद वेगळ्या मार्गाला लागला. यानंतर अमराठी कुटुंबाने बाहेरुन माणसं मागवून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी शुक्ला नावाच्या व्यक्तीने लोखंडी रॉडने डोक्यात केलेल्या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले आहेत. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले असून संतापाचे वातावरण आहे.