
मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून सायनमध्येही एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. सायन परिसरात अवघ्या सहा आणि आठ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलींची शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या अत्याचार प्रकरणी 25 वर्षीय तरूणाविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा आणि आठ वर्षांच्या या दोन्ही चिमुकल्या मुली सायन परिसरात रहात असून घटनेच्या संध्याकाळी त्या 5 वाजता खेळत होत्या. त्यावेळीच 25 वर्षांचा आरोपी तरूण हा त्या दोघींना एका वाहनामागे घेऊन गेला होता. तेथे त्याने त्या दोन्ही मुलींसोबत अश्लील कृत्य करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडित मुली घाबरल्या. त्यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि घरी धाव घेतली. पीडित मुलींपैकी एकीने धीर गोळा केला आणि घडलेल्या घटनेबाबात पालकांना सांगितलं.
हे ऐकताच त्या पालकांच्या पायाखालची वाळीच सरकली. पण आरोपीला शिक्षा करण्याचा निर्धार करत त्यांवी धारावी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याप्रकरणी तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम 64, 65 (2) व पोक्सो कायद्यातील कलम 4,8,12 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
आरोपी तरूणा हा सायन परिसरातील एका कारखान्यात काम करतो अशी माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.