Pune Crime : जामिनानंतर फरार झालेला महाठग टीव्ही चॅनलमुळे सापडला, १२ वर्षात ४ राज्यात १० पेक्षा जास्त गुन्हे

आरोपीने स्वतः बिल्डर तसेच डेव्हलपर असल्याचे भासवत भूखंडात गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवले आणि साथीदारांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून पुण्यातील एका हॉटेल व्यावसायिकाची ५२ लाख रुपयांची फसवणूक केली होती.

Pune Crime : जामिनानंतर फरार झालेला महाठग टीव्ही चॅनलमुळे सापडला, १२ वर्षात ४ राज्यात १० पेक्षा जास्त गुन्हे
| Updated on: Jun 26, 2025 | 9:47 PM

पुण्यातील एका हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक करुन तारखांना हजर न होणाऱ्या एका आरोपीचा छडा टीव्ही चॅनलच्या बातम्यांमुळे लागला आहे. या प्रकरणाती आरोपीने गेल्या १२ वर्षात चार राज्यात दहा पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. या काळात त्याने तब्बल १५ बोगस नावानी घोटाळे केले आहेत. या आरोपीला एका गु्न्ह्या संदर्भात टीव्हीवर पाहीले असता त्याचा छडा लागला. त्यामुळे पुण्याच्या न्यायालयातील फसवणूक खटल्यात त्याला आता सादर करण्यात आले आहे.

पुण्याच्या खेड-शिवापूर येथील रहिवासी आणि हॉटेल व्यावसायिक संजय विठ्ठलराव कोंडे देशमुख यांची आरोपीने फसवणूक केली होती. या प्रकरणात आरोपीने स्वत: बिल्डर आणि डेव्हलपर भासवत भुखंडात गुंतवणूक करण्याचे आमीष दाखवत आपल्या साथीदाराच्या मदतीने बनावट कागदपत्रांद्वारे ५२ लाखांची फसवणूक केली होती. त्यासाठी त्याने बोगस खाती, बोगस फर्म आणि सिमकार्डाचा वापर केला होता.
आरोपी साहिलअली मोहम्मदअली खान असे महाठगाचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यातील साल २०१२ मध्ये सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन कोर्टात खटला सुरु झाला होता.

या आर्थिक फसवणूक प्रकरणात प्रोडक्शन वॉरंट जारी होऊनही आरोपी न्यायालयात हजर राहत नव्हता. अटक झाल्यानंतर आरोपीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. शंभर दिवसांनी तो जामिनावर बाहेर आला. मात्र त्यानंतर न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहात राहिला. गेल्या बारा वर्षांपासून कोंडे देशमुख सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते.

अखेर एके दिवशी एका न्यूज चॅनलवर गोव्यातील एका आर्थिक गुन्ह्याची बातमी देशमुख यांनी पाहिली. आरोपीचे छायाचित्र पाहून त्यांनी ओळखले. मात्र नाव वेगळं असलं तरी चेहरा ओळखीचा वाटल्याने त्यांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला. खात्री केल्यानंतर आरोपीला अखेर पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलीसांचे काय म्हणणे ?

या आरोपीवर गोवा, हैदराबाद, दिल्ली आणि महाराष्ट्रात 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्यात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपी सध्या पणजी कारागृहात शिक्षा भोगत आहे असे सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी म्हटले आहे.