एकाच कुटुंबातील दोन महिलांचा अपघाती मृत्यू; एकाच सरणावर दोघींवरही अंत्यसंस्कार

व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून दुखवटा पाळला. अपघातात झालेल्या दोन्ही जावांचे सरण एकाच ठिकाणी लावून अंत्यविधी केला.

एकाच कुटुंबातील दोन महिलांचा अपघाती मृत्यू; एकाच सरणावर दोघींवरही अंत्यसंस्कार
| Edited By: | Updated on: Feb 27, 2023 | 10:35 AM

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर इथल्या एकाच कुटुंबातील दोन महिलांचा अपघाती मृत्यू झालाय. नांदेडच्या बारड गावाजवळच्या शिवारात कारला अपघात झाल्याने दोन महिलांनी जीव गमावलाय. वर्षा पाटील आणि किरण पाटील अशी मयत महिलांची नावे आहेत. अपघातात ठार झालेल्या दोन्ही जावा होत्या. या अपघातात अन्य जखमीवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता भोकर फाटा ते बारड या राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. यातील दोन जणांचा रुग्णालयात पोहचण्यापूर्वी मृत्यू झाला. या जावांवर गावात एकाचवेळी अंत्यविधी करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी सगळी दुकाने बंद ठेवत मयतांना श्रद्धांजली वाहिली. इस्लापूरच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र या महिलांना अखेरचा निरोप दिला. या अपघातात मयतामध्ये गावाच्या माजी सरपंच महिलेचा होता.

मृतक आणि जखमी इस्लामपूर येथील रहिवासी

बारड-भोकर रस्त्यावर माऊली पेट्रोल पंपासमोर मालवाहू गाडी आणि प्रवासी वाहतूक गाडी क्रमांक एम एच 26 बी क्यू 6462 मध्ये समोरासमोर धडक झाली. घटनेची माहिती मिळतात बारड पोलीस मदत केंद्रातील सरकारी वाहन घेवून पोहचले. यात पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार, पोलीस अंमलदार ठाकूर, थाडके, आवातीरक, रणवीरकर, मस्के, गनी आणि हिंगणकर यांचा समावेश होता. पोलीस पथकाने प्रवासी गाडीतील जखमी प्राची प्रवीण पाटे (वय 15 वर्ष ), किरण प्रवीण पाटे (वय 37 वर्षे), प्रवीण रामराव पाटे हे जखमी झाले. हे तिघेही किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील रहिवासी आहेत. तर सचिन सटवाजी सावते हे अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या अपघातात वरील दोन महिलांचा मृत्यू झाला.

दोन्ही जावांचे सरण एकाच ठिकाणी

इस्लापूर येथील माजी सरपंच वर्षा संभाजी वानखेडे (वय ५८), आणि किरण प्रवीण वानखेडे (वय ३६ वर्षे ) यांचा शनिवारी सायंकाळी मोटार अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून दुखवटा पाळला. अपघातात ठार झालेल्या दोन्ही जावांचे सरण एकाच ठिकाणी लावून अंत्यविधी केला. वर्षा वानखेडे यांच्या पश्चात पती, दोन मुले, नातू असा परिवार आहे. तर किरण वानखेडे यांच्या पश्चात पती, मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.