कार दरीत कोसळली अन् गुटखा रॅकेटच बिंग फुटलं, आलिशान कारमध्ये… अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ

अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यात एका कार अपघातामुळे मोठे अवैध गुटखा रॅकेट उघडकीस आले आहे. कऱ्हे घाटात दरीत कोसळलेल्या अलिशान इनोव्हा कारमध्ये ₹8.37 लाखांचा गुटखा साठा आढळून आला. या घटनेने राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची परराज्यातून होणारी तस्करी आणि विक्रीचे धक्कादायक वास्तव समोर आले.

कार दरीत कोसळली अन् गुटखा रॅकेटच बिंग फुटलं, आलिशान कारमध्ये... अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ
car accident
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 10, 2026 | 11:37 PM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ड्रग्स आणि इतर अंमलीपदार्थ विकले जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या गुटख्याची सर्रास विक्री होतानाही दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच गुटख्यांवर कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही लपूनछपून गुटखा विक्री सुरूच आहे. अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघात झाल्याने गुटखा विक्रीचं मोठं रॅकेटच उघड झालं आहे. त्यामुळे सर्वच हादरून गेले.

संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटात झालेल्या एका भीषण कार अपघाताने अवैध गुटखा वाहतुकीचं मोठं रॅकेट उघड झालंय. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही “गुटखा किंग” अलिशान कारमधून गुटखा कसा पोहोचवतात याचं धक्कादायक वास्तव या अपघातातून समोर आलंय. अपघातानंतर कार दरीत कोसळली आणि पोलिसांनी ती वर काढताच कारच्या आत लाखोंचा गुटखा साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. त्यामुळे या प्रकरणामागील मोठं जाळं उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार बाहेर काढली अन्…

कऱ्हे घाटात घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही युवकांना तात्काळ उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दरीत कोसळलेली इनोव्हा कार वर काढली. मात्र कारची तपासणी करताच पोलिसांनाही धक्का बसला. कारण गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठा आढळून आला.

जखमींची प्रकृती चिंताजनक

पान मसाल्याच्या नावाखाली जवळपास 8 लाख 37 हजार रुपयांचा गुटखा या कारमध्ये आढळून आला. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही अशा पद्धतीने परराज्यातून माल आणून संगमनेरमध्ये विक्री केली जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, जखमी आरोपींची प्रकृती चिंताजनक असून हा गुटखा नेमका कुठून आला आणि कोणाच्या सांगण्यावरून कुठे नेला जात होता, याचा तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे, याआधीही सायखिंडी फाट्याजवळ तालुका पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीतून लाखोंचा गुटखा जप्त केला होता. त्यामुळे संगमनेर परिसरात अवैध गुटखा रॅकेट सक्रीय असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Follow Us