Akola News : ऐन दिवाळीत काळाचा घाला, पाडव्याआधीच पती-पत्नीचा मृत्यू, भीषण अपघातात 3 ठार

बोरगावमंजू येथील धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट हे जोडपं त्यांचं काम आटपून आपल्या चारचाकी गाडीने घरी जात होते. मात्र रस्त्यात त्यांची गाडी अचानक बंद पडली. त्यांनी मदतीसाठी फोन केला. नंतर जे घडलं...

Akola News : ऐन दिवाळीत काळाचा घाला, पाडव्याआधीच पती-पत्नीचा मृत्यू, भीषण अपघातात 3 ठार
| Updated on: Oct 22, 2025 | 11:16 AM

संपूर्ण राज्यासह देशात दिवाळीचा उत्साह आहे. लक्ष्मीपूजन पार पडलं, आज पाडवा आणि उद्या भाऊबीजेचा सणही आनंदात पार पडेल. मात्र याच सणाला अकोल्यात मात्र गालबोच लागलं ते एका भीषण अपघातामुळे. अकोल्यात दिवाळीच्या रात्री दुःखद घटना घडली. अकोला – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडा जवळ वाहनाचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 जणांना अज्ञात वाहनाने उडवलं, त्यात तिघांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. जखमीवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सणाच्या दिवशीच तिघांवर काळाने घाला घातल्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अश्विनी शिरसाट, धिरज सिरसाठ या पती-पत्नीचा मृत्यू झाला तसेच आणखी एक इसम आरिफ खान यांनाही जीव गमवावा लागला. तर अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, बोरगावमंजू येथील धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट हे जोडपं त्यांचं काम आटपून आपल्या चारचाकी गाडीने घरी जात होते. मात्र रस्त्यात त्यांची गाडी अचानक बंद पडली. त्यांनी मदतीसाठी फोन केला, त्यानंतर बंद पडलेली कार मालवाहू गाडीने टोचन करून नेत असताना पैलपाडा गावाजवळ चौघे जण गाडीतून उतरले आणि त्या कारचे टायर्स तपासत होते. ते रस्त्याच्या बाजूला उभे होते,मात्र तेवढ्या अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात गाडीने त्यांना चिरडलं. चौघेही गंभीर जखणी अवस्थेत, रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. धडक एवढी जबर होती की त्यात तिघांचा मृत्यू झाला.

अश्विनी शिरसाट, धिरज सिरसाठ या दांपत्याला एकत्र मृत्यू आला. तर आरिफ खान यांनीही अपघातात अखेरचा श्वास घेतला. ते तिघेही बोरगावमंजूचे रहिवासी होते. आणखी एक जण अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.