
मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन, माजी आमदार अरुण गवळी 18 वर्षानंतर नागपूरच्या सेंट्रल जेलमधून सुटला. दगडी चाळीत अरुण गवळीचं जल्लोषात स्वागत झालं. या 18 वर्षात अरुण गवळीला त्याच्या पत्नीने प्रचंड साथ दिली. त्यांच्या मुलांनी आणि दगडीचाळीतील रहिवाश्यांनीही गवळीला साथ दिली. गवळीवर दगडीचाळीतील लोक भरभरून प्रेम करत असतात. म्हणूनच त्याला तिथले लोक प्रेमाने डॅडी आणि त्यांच्या पत्नी आशा गवळीला मम्मी म्हणून हाक मारत असतात. आशा गवळीचाही दगडीचाळीत दरारा आहे. पण हा दरारा प्रेमाचा आहे.
कोण आहेत आशा गवळी?
संपूर्ण मुंबई अरुण गवळीला डॅडी म्हणून ओळखते. आधी ही ओळख डॉन अशी होती. पण अरुण गवळी राजकारणात आल्यानंतर त्याची ओळखही बदलली. आशा गवळी या अरुण गवळीच्या पत्नी आहेत. त्यांना गीता, महेश, योगिता, योगेश आणि अदमिता ही मुलं आहेत. आशा गवळी या मूळात मुस्लिम होत्या. त्यांचं अरुण गवळीवर प्रेम जडलं. प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं. लग्नानंतर आशा यांनी धर्मांतर करून हिंदू धर्म स्वीकारला. आशा गवळीचे वडील पुण्याचे. मोहम्मद शेख लाल मुजावर ऊर्फ न्हानू भाई हे त्यांच्या वडिलांचं नाव. तर आशा गवळीचं मूळ नाव आयशा बानो.
दहावीनंतर शाळा सोडली अन्…
17 जुलै 1955 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे अरुण गवळीचा जन्म झाला. त्याचे वडील गुलाबराव गवळी मजुरी करायचे. नंतर गवळी कुटुंब मुंबईत आलं. इयत्ता दहावीनंतर शाळा सोडल्यावर अरुण गवळीने आधी भायखळ्याच्या सिम्प्लेक्स मिल्समध्ये काम सुरू केलं. त्यानंतर विक्रोळीच्या गोदरेज अँड बॉयस कंपनीतही काम केलं. त्यानंतर कांजुरमार्गच्या क्रॉम्प्टन ग्रीव्स कंपनीतही काम केलं. गँगस्टर पारसनाथ पांडेच्या जुगाराच्या अड्ड्यावरही काही काळ काढला.
रमा नाईक मारला गेला अन्… दाऊदसोबतची दोस्ती दुश्मनीत कशी बदलली? वाचा अरुण गवळीची इन्साईड स्टोरी
80 च्या दशकात काय घडलं?
80च्या दशकात अरुण गवळीची गुन्हेगारीकडे वाटचाल सुरू झाली. त्याकाळात तो थेट दाऊद इब्राहीमच्या संपर्कात आला. त्यावेळी दाऊड अंडरवर्ल्ड डॉन म्हणून नावारुपाला येत होता. त्यावेळी गवळीची रमा नाईकशी दोस्ती होती. रमा नाईकनेच त्याची दाऊदसोबत भेट घडवली. त्यानंतर गवळीच्या आयुष्यात एक मोठा ट्विस्ट आला. 1988 मध्ये रमा नाईकची हत्या झाली. या हत्येमागे दाऊद असल्याचा गवळीला संशय होता. त्यानंतर त्याने दाऊदची साथ सोडली आणि स्वत:ची गँग तयार केली. त्यानंतर त्याचे दाऊद गँग सोबत वारंवार राडे होऊ लागले. 26 जुलै 1992मध्ये गवळीच्या साथीदारांनी दाऊदची मोठी बहीण हसीना पारकरचा नवार इब्राहीमला ठार मारलं. त्यामुळे गवळीची मुंबईत प्रचंड दहशत वाढली. त्यानंतर मुंबईतील गँगवार वाढत गेलं.
अन् अरुण गवळीबद्दल समजलं…
आशा गवळी या सहा महिन्याच्या गर्भवती होत्या. अरुण गवळी तेव्हा मिल कामगार म्हणून काम करत होते. भायखळ्याच्या सिम्प्लेक्स मिलमध्ये तो कामाला होता. त्यावेळी मिल बंद पडली. एके रात्री अचानक पोलीस घरात घुसले आणि अरुण गवळीला सोबत घेऊन गेले. तीन महिन्यानंतर जामीन मिळाल्यावर अरुण गवळीची सुटका झाली. अन् तिथून त्यांचा गुन्हेगारी विश्वातील प्रवास सुरू झाला.