Beed : लग्नासाठी जात असताना अपघात, स्विफ्ट डिझायर आणि आयशर टेम्पोच्या जबर धडकेत 6 ठार

| Updated on: Aug 14, 2022 | 10:52 AM

Beed Accident News : कारच्या आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या गाडीचा आतला भाग रक्ताने माखून गेला होता.

Beed : लग्नासाठी जात असताना अपघात, स्विफ्ट डिझायर आणि आयशर टेम्पोच्या जबर धडकेत 6 ठार
भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बीड : विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूची घटना ताजी असतानाच आता आणखी एका भीषण (Beed Accident News) अपघाताचं वृत्त समोर आलंय. बीडमधील पाटोदा- मांजरसूंबा रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. लग्नासाठी जात असताना हा अपघात घडल्यानं लग्नकार्य असलेल्या घरावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय. स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडला. स्विफ्ट डिझायर कारचा यामध्ये अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. या अपघातावेळी दोन्ही गाड्यांमध्ये झालेल्या धडकेचा आवाज काळजाचा थरकाप उडवणारा होता. पुण्यात आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी स्विफ्ट डिझायर (Swift Dzire) कारमधून कुटुंबीय निघाले होते. दरम्यान, केज तालुक्यातील जीवाचीवाडी इथं जात असताना गाडीचा अपघात झाला आणि सहा जण जागीच ठार झाले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

स्विफ्ट कारचा झालेला अपघात एवढा भीषण होता की ही कार आयशर टेम्पोच्या खाली घुसली होती. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार अखेर वेगळी करण्यात आलं. त्यानंतर कारच्या आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या गाडीचा आतला भाग रक्ताने माखून गेला होता. गाडीतील प्रवाशांना जबर मार बसून मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला होता. या भीषण अपघातानंतर पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केलं. सर्व मृतदेह बाहेर काढले.

दरम्यान, या अपघातातील मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. सध्या अपघातातील सर्व मृतदेह हे रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. पोलिसांकडूनही अपघाताची नोंद करुन घेण्यात आली असून पुढील कारवाई केली जातेय. मात्र या अपघातामध्ये कार आणि ट्रक या दोघांचंही नुकसान झालंय.

हे सुद्धा वाचा

रविवार ठरतोय अपघावार

दरम्यान, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरती देखील कार अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला पोलीस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर चालक सुखरूप आहे. रविवारी दिवसभरात अपघाताच्या दोन मोठ्या बातम्या समोर आल्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. तसंच रस्ते अपघातांचं प्रश्नही ऐरणीवर आलाय. विनायक मेटे यांच्या मृत्यूने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळालाही मोठा धक्का बसलाय.