
सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात धक्कादायक घटना घडली आहे. संपूर्ण शहरात जनशराज्य शक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले होते. आता या बॅनरखाली जादूटोणा करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा रंगली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मिजर शहरात जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शहरभर बॅनर लावण्यात आले होते. मात्र म्हेत्रे यांना शुभेच्छा देणाऱ्या एका फलकाखाली त्यांच्यावरच जादूटोणा करण्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या फलकाच्या खाली गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या जादूटोण्याचे प्रकार घडत आहेत.
मिरज शहरातल्या माळी समाजाच्या स्मशानभूमी शेजारी डॉक्टर पंकज म्हेत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फलक चार दिवसांपूर्वी लावण्यात आला होती. मात्र या फलकाच्या खाली गेल्या तीन दिवसांपासून कधी हिरव्या, कधी लाल, कधी काळ्या रंगाच्या कापडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भानामती करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य गुंडाळून टाकण्यात आल्याचं समोर आले आहे.
मिरजेतील माळी स्मशानभूमीच्या शेजारी असणाऱ्या बाकड्यावर बसण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. या नागरिकांनी ही बाब म्हेत्रे यांच्या लक्षातआणून दिली. मात्र म्हेत्रे यांनी आश्चर्य व्यक्त करत अंधश्रद्धेला आपण मानत नसल्याचे म्हटलं आहे.
याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दखल घेतली आहे, सदर प्रकार हा अंधश्रद्धेतून करण्यात आलेला आहे. अशा प्रकारांमुळे कोणाचाही चांगलं आणि वाईट होत नाही. त्यामुळे अशा गोष्टी करणाऱ्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
दरम्यान, डॉ. पंकज म्हेत्रे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभेच्छा फलकाच्या खालीच जादूटोण्याचा प्रकार घडल्याने, त्यांच्या पक्षाची मिरज तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय घोडदौडलेला लगाम लावण्यासाठी ही जादूटोण्याचा हा प्रकार करण्यात आला नाही ना ? अशी चर्चा रंगली आहे.