कीटकनाशक पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्यांना उलट्या होऊ लागल्या, डॉक्टरकडे नेले पण…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढे येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवण्यासाठी धान्यात कीटकनाशक पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरभर पसरला होता.

कीटकनाशक पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्यांना उलट्या होऊ लागल्या, डॉक्टरकडे नेले पण...
कीटकनाशकाच्या वासाने उलट्या होऊन बहिण-भावाचा मृत्यू
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 15, 2023 | 8:57 AM

कराड / दिनकर थोरात (प्रतिनिधी) : धान्य साठवण्यासाठी टाकलेल्या कीटकनाशक पावडरच्या उग्र वासाने उलट्यांचा त्रास होऊन भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कराडमध्ये घडली आहे. कराड तालुक्यातील मुंढे गावात ही घटना घडली आहे. श्लोक अरविंद माळी वय 3 वर्षे व तनिष्क अरविंद माळी वय 7 अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. उग्र वासामुळे श्लोक आणि तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कराड पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढे येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवण्यासाठी धान्यात कीटकनाशक पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरभर पसरला होता.

पावडरच्या उग्र वासामुळे मुलांना उलट्या होऊ लागल्या

दरम्यान या उग्र वासामुळेच श्लोक आणि तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे सोमवारी प्रथम तीन वर्षाच्या श्लोकला उलट्या आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी त्याला कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

उपचारादरम्यान दोन्ही मुलांचा मृत्यू

उपचार सुरू असतानाच सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याची मोठी सात वर्षांची बहीण तनिष्का हिलाही उलट्या आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिलाही नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचाही मंगळवारी मृत्यू झाला.

श्लोकच्या शवाविच्छेदन अहवालात अंतर्गत अति रक्तस्त्रावामुळे आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर तनिष्काचे मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन केले असून त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळाला नसल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.