डोंबिवली रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

डोंबिवली रेल्वे स्थानकावरील ब्रीजवर चढत असताना एका प्रवाशाचा दुसऱ्या प्रवाशाला पाय लागल्याने दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. या वादातून दुसऱ्या दोन प्रवाशांनी सागर भिसे या व्यक्तीला मारहाण केली.

डोंबिवली रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
क्षुल्लक कारणातून प्रवाशांमध्ये हाणामारी
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 16, 2023 | 2:51 PM

डोंबिवली / सुनील जाधव (प्रतिनिधी) : डोंबिवली रेल्वे स्थानकावर ब्रिज चढत असताना एकमेकांना पाय लागल्याने प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सागर भिसे असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भर गर्दीत मारामारी झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती. या प्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

ब्रिज चढत असताना पाय लागल्याने वाद

डोंबिवली रेल्वे स्थानकावरील ब्रीजवर चढत असताना एका प्रवाशाचा दुसऱ्या प्रवाशाला पाय लागल्याने दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. या वादातून दुसऱ्या दोन प्रवाशांनी सागर भिसे या व्यक्तीला मारहाण केली.

सागर भिसे हा काल सायंकाळी घाटकोपरहून डोंबिवलीत आला. डोंबिवलीत उतरल्यानंतर रेल्वे ब्रीजच्या पायऱ्या चढत असताना त्याचा एका इसमाला पाय लागला. यानंतर सागरने त्यांची माफी मागितली आणि सदर इसम तेथून निघून गेला.

वाद मिटल्यानंतरही अनोळखी इसमांकडून मारहाण

हा सर्व प्रकार सागरच्या मागून चालत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी पाहिला. ते दोघे सागरशी हुज्जत घालू लागले. यावर सागरने त्यांना आमचा अपसात वाद मिटला असून, तुम्ही मध्ये पडू नका असे सांगितले.

यानंतर सदर इसमांनी सागरला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मारहाणीत एका व्यक्तीच्या हातातील कडे सागरच्या हाताला आणि ओठाला लागले. मारहाण करुन ते दोघे तेथून पळून गेले.

यानंतर पीडित सागरने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन अनोळखी इसमाबाबत गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.