
चालता-चालता छत्रीचा धक्का काय लागला, तो छोटासा प्रसंग महिलेच्या जीवावरच बेतला. छत्री लागल्याच्या रागामुळे एका इसमाने 35 वर्षांच्या महिलेच्या पाठीत थेट काचेचा तुकडा खुपसल्याने ती गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना वरळी सी-फेस येथे घडली आहे. शनिवारी (19 एप्रिल) या भयानक प्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. काच पाठीत खुपसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारांसाठी तताडीने केईएममध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ शोधमोहिम राबवून अवघ्या 5 तासांच्या आरोपीला अटक करत बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या घटनेमुळे दहशत माजली असून नागिरकांमध्य भीतीचे वातावरण आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता बाळू पाटकर असे जखमी महिलेचे नाव आहे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास अनिता या वरळी परिसरातील जे के कपूर चौक येथून जात होत्या. मात्र त्याचवेळी त्यांच्या हातात असलेली छत्री त्या परिसरातील एका इसमाला लागली. छत्री लागल्याने तो इसम चांगलाच भडकला. रागाच्या भरात त्याने मागचा पुढचा विचार न करताच त्याच्या हातात असलेल्या काचेचा तुकडा थेट त्या महिलेच्या पाठीत खुपसला. काच घुसल्याने अनिता या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. त्यांना उपचारांसाठी तातडीने केईएममध्ये दाखल करण्यात आले.
याप्रकरणी पीडित महिलेला मुलगा संदीप बाळू पाटकर याने वरळी पोलिसांत धाव घेत संपूर्ण प्रकार कथन करत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार धारदार शस्त्राने जखमी केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) दत्तात्रय कांबळे व सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तत्काळ पोलिस पथकाची नेमणूक करून याप्रकरणी तपासाचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या कक्ष-३ च्या पोलिसांनी याप्रकरणी समांतर तपासाला सुरूवात केली.
गुन्हा घडला त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले आणि काच खुपसणाऱ्या आरोपीचा 5 तासांत शोध लावून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. सचिन भगवान अवसरमोल(35) असे आरोपीचे नाव असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. वरळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.