
नवी दिल्ली : दिल्लीतील अलीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पल्ला गावात (Delhi Crime News) लग्न समारंभात असलेल जल्लोषाचे वातावरण स्मशान शांततेत बदलले. लग्न स्थळापासून काही अंतरावर एका व्यक्तीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पार्वती चौकातील शिववाटिका भागात ही घटना घडली. संजय नावाच्या व्यक्तीने सुनील चौहान यांची गोळ्या झाडून हत्या केली. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, 7 महिन्यांपूर्वीही आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यात भांडण झाले होते, परंतु एकाच कुटुंबातील सदस्य असल्याने समेट घडवून आणण्यात आला होता.
रविवारी रात्री पल्ला गावात लग्न समारंभ होता, त्यावेळी विवाह स्थळापासून काही अंतरावर असलेल्या शिव गार्डनमध्ये आरोपी संजय पिस्तुल हातात घेऊन नाचत होता. यादरम्यान संजयने सुनील चौहानवर काही भाष्य केले आणि दोघांमध्ये भांडणाला तोंड फुटले.
वादानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत केले. मात्र संजयने संतापाच्या भरात शिव गार्डनपासून काही अंतरावर जाऊन सुनील चौहान यांच्या छातीत गोळी झाडली. यानंतर सुनील चौहान यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या हत्येबाबत डीसीपी विजेंद्र यादव म्हणाले की, हत्येचा आरोपी संजयला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अलीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत. आम्ही मृताच्या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु कौटुंबिक कारण असल्यामुळे त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.
संजय आणि सुनील चौहान यांच्यात अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता आणि रविवारी रात्री लग्न समारंभात काही कारणावरून झालेल्या वादातून संजयने सुनील चौहानची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अशा परिस्थितीत, संजय आणि सुनील चौहान यांच्यात कोणत्या कारणावरुन वाद झाला? संजयकडे असलेले शस्त्र कोणी पुरवले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
सध्या अलीपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सुनील चौहान यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी बाबू जगजीवन राम रुग्णालयात पाठवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.