शिकवणीच्या सराव परीक्षेत कमी गुण, शिक्षक असलेल्या बापाची मुलीला बेदम मारहाण, लेकीचा मृत्यू

Crime News: बारावीच्या खासगी शिकवणीच्या सराव परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाले. यामुळे स्वत: शिक्षक असलेल्या जन्मदात्या बापाने मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला.

शिकवणीच्या सराव परीक्षेत कमी गुण, शिक्षक असलेल्या बापाची मुलीला बेदम मारहाण, लेकीचा मृत्यू
आरोपी धोंडीराम भोसले
| Updated on: Jun 23, 2025 | 9:08 AM

Crime News: बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असते. यामुळे काही पालकांकडून मुलांवर अपेक्षांचे प्रचंड ओझे टाकले जाते. त्यातून अनेक दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर आले आहे. परंतु सांगली जिल्ह्यात वेगळाच प्रकार समोर आला. बारावीच्या खासगी शिकवणीच्या सराव परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाले. यामुळे स्वत: शिक्षक असलेल्या जन्मदात्या बापाने मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्या शिक्षक बापाला अटक करण्यात आली आहे.

काय घडला प्रकार?

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे. गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले धोंडीराम भगवान भोसले यांची मुलगी साधना धोंडीराम भोसले (वय 17) बारावीत आहे. धोंडीराम भोसले यांनी मुलीला खासगी शिकवणी लावली आहे. खाजगी शिकवणीत घेतलेल्या बारावीच्या सराव परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले. त्यानंतर चिडलेल्या जन्मदात्या बापाने आपल्या लेकीला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्या मुलगी साधना हिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी धोंडीराम भोसले यांना खून प्रकरणी अटक केली आहे. दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या साधनाच्या आईला आपल्या पतीविरोधात पोलिसात फिर्याद देण्याचे वेळ आली.

साधना अभ्यासात हुशार होती. तिला दहावीला 92.60 टक्के गुण मिळाले होते. तिचा शाळेत तिने पहिला क्रमांक मिळला होता. बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तिने तयारी सुरू होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. त्यासाठी खाजगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. त्यात तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते. शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली. घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. साधनाच्या डोक्याला जबर मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली. तिला दवाखान्यात नेले असता उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.

आरोपीची पत्नी होती सरपंच

मुलीचा मृत्यू झाल्यानंतर अपराधी पित्याने आपले कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु शवविच्छेदन अहवालातून प्रकार समोर आला. धोंडीराम भोसले यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. धोंडीराम भोसले यांची पत्नी गावात सरपंच होत्या. तसेच त्यांचे वडील भगवान भोसले हे पोलीस पाटील होते.