परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू तर नांदेड येथे दोन महिलांचे मृतदेह सापडले

राज्यात पावसाने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. परळीत पाण्यात कार वाहून गेल्याने तिघांना वाचवण्यात यश आले असले तरी एकाचा मृत्यू झाला आहे. बीडमध्ये दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.

परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू तर नांदेड येथे दोन महिलांचे मृतदेह सापडले
file photo
| Updated on: Aug 18, 2025 | 8:06 PM

राज्यात गेले दोन ते तीन दिवस पावसाचा धुमाकुळ सुरु असून विविध अपघातात किमान तिघांचा मृत्यू झाला आहे. परळी तालुक्यातील कवडगाव हुडा येथील रस्त्यावरील नदीपात्रात काल रात्री एक कार वाहून गेली. या कारमध्ये चार जण बसले होते त्यापैकी तिघांना बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.

राज्यात पावसाचा जोरदार मारा सुरु असून अनेक नद्यांना पुर आला आहे. परळी हुडा कौडगाव येथील पुलावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने फोर व्हीलर गाडी पुलावरून नदीच्या पात्रात वाहून गेली. रात्री एक वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की दिग्रस येथील काही तरुण गाडीमधून जात असताना कवडगाव हुडा येथे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत.

पोलीसांनी प्राणाची बाजी लावून तिघांना वाचवले

पाण्याचा अंदाज नसतानाही पोहण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे पोलिस मार्ग काढत रिक्षा घेऊन पाण्यात उतरले. दोर वापरून युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापर्यंत दोर पोहोचत नव्हता, त्यामुळे पाण्यामध्ये जाऊन पोलिसांनी स्वत:च्या आणि त्या युवकाच्या कंबरेला दोर बांधून त्याला रात्रीच्या अंधारात बाहेर काढले. तिघा तरुणांना वाचवण्यत यश आले. परंतू विशाल बल्लाळ हा पुणे येथील रहिवाशी असून त्याला पोहता येत नसल्यामुळे तो भयभीत झाल्याने कुठल्याही झाडाला पकडू शकला नाही. त्यामुळे तो एका बाभळीच्या झाडाला अडकलेला आढळून आला त्याची डेड बॉडी ताब्यात घेऊन पीएम करून त्याच्या नातेवाईकांकडे अंतिमसंस्कारसाठी पाठवून दिली आहे.

 लग्नासाठी परळी येथे आला होता

पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषीकेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक केले आहे. तिघांना वाचवण्यामध्ये प्रशासनाला यश आले असून तब्बल 12 तासानंतर चौथ्या युवकाचा मृतदेह मिळाला. मयत विशाल बल्लाळ हा ( वय 24 ) पुणे येथील रहिवाशी असून लग्नासाठी परळी येथे आला होता.

नांदेड येथे दोन महिलांचे मृतदेह सापडले

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. गंगाबाई मादळे आणि भीमाबाई मादले यांचे मृतदेह सापडले आहे. अन्य चार ते पाच जणांचा शोध सुरू आहे.

गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली.

बीडच्या माजलगाव तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे, यामध्ये गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले आहे.हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आहे.या,परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.