पुण्याच्या चाकण येथे पाझर तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. ही मुले सकाळी घरातून खेळण्यासाठी बाहेर पडली होती. मुले आली नसल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली. पाझर तलावा जवळ चारही जणांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर तलावात शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चाकण पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चाकण येथील कडाचीवाडी (ता.खेड ) येथील पाझर तलावात मुले पोहायला गेली होती. त्यानंतर ही मुले परतली नसल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. अखेर तलावाच्या काठावर कपडे सापडल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेत ओमकार बाबासाहेब हंगे (वय १, रा.बीड ), श्लोक जगदीश मानकर (वय १३ वर्षे,रा. अमरावती),प्रसाद शंकर देशमुख( वय.१३ रा.नांदेड),नैतिक गोपाल मोरे ( वय.१३ वर्षे, रा. अकोला ) असे दुर्दैवी मुलांची नावे आहेत. मुलांच्या मृत्युने खळबळ उडाली आहे.
डस्टर कारचा पार चेंदामेदा, दोन ठार तर दोन जखमी
मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारने एका अज्ञात वाहनाला धडक दिल्यानंतर या कारला कंटेनर ट्रकने मागून धडक मारल्याने डस्टर कारचा पार चेंदामेदा झाल्याची भीषण घटना घडली आहे. या कारच्या आत बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील हे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडे येताना मेंढवण खिंड परिसरातील मनोर गेट हॉटेल येथे शनिवारी सकाळी हा भीषण अपघात घडला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर मेंढवण खिंड परिसरात रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू होते. त्यामुळे एक मार्गिका बंद करण्यात आली होती. त्यावेळीच मनोर गेट परिसरात एका वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने डस्टर कार त्या समोरच्या वाहनावर आदळली. त्याच वेळी या कारला पाठीमागून येणाऱ्या एका अवजड ट्रकने जोरदार धडक दिली. राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अपघात घडला आहे.
दोन ट्रकच्यामध्ये ही कार अडकल्याने हा भीषण अपघातात घडला. यात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात एकाच कुटुंबाचे तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की डस्टर कारचा चक्काचूर झाला आहे.मृतांमध्ये क्लेटन वेल्स (वय ४२), फॅबीओला वेल्स (वय ४५), ग्लोरिया वेल्स (वय ७३) यांचा समावेश आहे. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोन जण या अपघातात जखमी झाले त्यांची नावे रेडन वेल्स (वय ९), हेनान वेल्स (वय ६३) अशी आहेत.
ट्रक घरात घुसला…
जनावरांची तस्करी करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करताना हा एका घरात घुसल्याची घटना अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापुर येथे घडली आहे. जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा गावकऱ्यांनी पाठलाग केल्याने ट्रक चालकाने घाबरला आणि त्याचे नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला आहे. गावकरी कंटेनर आणि ट्रकचा पाठलाग करीत असताना हा अपघात घडला. गावकऱ्यांपासून वाचण्यासाठी या ट्रक चालकाने आपलं वाहन थेट एका घरावर चढवल्याने घराचं मोठं नुकसान झाले आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. संपूर्ण प्रकरणाची मुर्तीजापुर शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
वाहनाला साईड देताना एक सिमेंटचा कंटेनर पलटला
वाहनाला साईड देताना एक सिमेंटचा कंटेनर उलटल्याची घटना नांदेड येथील भोकर – हिमायतनगर रस्त्यावरील खडकी फाटा येथे घडली आहे. समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाला साईड देतांना हा अपघात झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. हा कंटेनर पलटल्यानंतर रस्त्यावर जवळपास 100 फूट घासत गेला.या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने चालक बचावला आहे. जखमी चालकाला स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
ठाणे-घोडबंदर येथे ट्रकची डिवायडरला धडक
घोडबंदर ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रक चालकाचे नियंत्रण गमावल्याने त्याचा ट्रक मानपाडा ब्रिज चढणीवरती डिवायडरला धडकल्याचा प्रकार घडला.त्यानंतर या अपघातग्रस्त चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. या घटनेमुळे या मार्गावर काही तास वाहन चालकांना वाहतूक कोंडी सामना करावा लागला. वाहतूक विभागाने क्रेनच्या साह्याने या अपघातग्रस्त ट्रकला बाजूला करण्याचे काम सुरू केले. या अपघातामुळे कोणतीही जीवितहानी नाही झालेली नाही.
पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात कारची jcb ला धडक
एका कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही भरधाव कार थेट रस्त्याकडेला उभ्या असलेल्या जीसीबी वाहनावर धडकली. पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात हा अपघात घडला. या अपघातामध्ये कार चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोर शहरातील हे वर्दळी ठिकाण आहे. सुदैवाने या रस्त्याच्याकडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांना या अपघातांमध्ये कुठलीही इजा झाली नाही.या अपघातात कारची पुढील बाजू चेपल्याने या कारचे मोठे नुकसान झाले आहे.