गीता ये तूने क्या किया… घागरा चोलीत प्रेत, जिला बायको समजला तो तर…; पोस्टमार्टेम रिपोर्टमधील धक्कादायक खुलासा काय?

गुजरातमधील एका गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते देखील चकीत झाले.

गीता ये तूने क्या किया... घागरा चोलीत प्रेत, जिला बायको समजला तो तर...; पोस्टमार्टेम रिपोर्टमधील धक्कादायक खुलासा काय?
Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 30, 2025 | 6:34 PM

गुजरातच्या पाटणमधील एका गावात काही दिवसांपूर्वी घाघरा आणि ब्लाउज परिधान केलेला एका वृद्धाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. हा वृद्ध व्यक्ती दलित समाजातील होता, त्यामुळे त्याच्या रहस्यमयी मृत्यूनंतर परिसरात तणावही वाढू लागला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर जे सत्य समोर आलं, ते खरंच धक्कादायक होतं.

गुजरातमधील या प्रकरणात जाखोत्रा गावातील 23 वर्षीय गीता आणि तिचा प्रियकर भरत लुभाअहिर यांना अटक करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख 56 वर्षीय दलित मजूर हरजी देभा सोलंकी अशी झाली. चौकशीदरम्यान गीताने खुलासा केला की, तिने गावातील वृद्ध व्यक्तीला घाघरा आणि चोली परिधान करून मारलं. कारण तिला असं दाखवायचं होतं की तिचा मृत्यू झाला आहे. गीताला आपल्या प्रियकरासोबत गुपचूप गाव सोडून पळून जायचे होते.

वाचा: कधीच अचानक हार्ट अटॅक येत नाही, महिनाभर आधी जाणवतात ‘ही’ लक्षणे

गीता आधीच विवाहित

पोलिसांच्या मते, गीता आधीच विवाहित होती. तिच्या पतीचं नाव सुरेश गेंगा भीमा आहे. तिला एक तीन वर्षांची मुलगीही आहे. गीता तिचा प्रियकर भरतसोबत जोधपूरला पळून जाण्याचा प्लॅन करत होती. या योजनेनुसार, दोघांनी सोलंकीला मारलं आणि त्याच्या मृतदेहाला गीताचे कपडे घालून जाळलं, जेणेकरून असं वाटावं की गीताचा मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यासाठी दोघांनी सोलंकीला दारू पाजून बेशुद्ध केलं आणि नंतर त्याला जाळलं.

पतीला वाटलं गीताचा मृतदेह आहे

27 मे रोजी सकाळी सुरेश आपल्या तीन वर्षांच्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने जागा झाला. त्याला त्याची पत्नी गीता घरात दिसली नाही. पत्नीचा शोध घेताना तो घराच्या मागे गेला, तिथे त्याला एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, जो पाहून त्याची पायाखालची जमीनच सरकली. तो मृतदेह नारंगी आणि जांभळ्या रंगाच्या घाघरा-चोलीत होता आणि पायात चांदीचे पैजण होते. हे तेच कपडे होते जे त्याच्या 22 वर्षीय पत्नी गीताने परिधान केले होते. सुरेशला वाटलं की त्याच्या पत्नीने आत्महत्या केली आहे आणि त्याने पोलिसांना माहिती दिली. पण काही तासांच्या तपासानंतर प्रकरण पूर्णपणे उलटलं. पोस्टमॉर्टम अहवालातून कळलं की हा मृतदेह 56 वर्षीय दलित व्यक्ती हरजी देभा सोलंकीचा होता, जो वौवा गावात (जाखोत्रापासून 7 किमी अंतरावर) राहत होता.

ट्रेन पकडण्याआधीच अटक

माहितीनुसार, 27 मे रोजी सकाळी जेव्हा मृतदेह सापडला, तेव्हा स्थानिकांनी याला जातीय हिंसाचार मानलं, पण पोस्टमॉर्टम आणि तपासात खरं सत्य समोर आलं. पोलिसांनी 28 मे रोजी पहाटे 4 वाजता पालनपूर रेल्वे स्टेशनवरून गीता आणि भरतला अटक केली. दोघे जोधपूरला जाणारी ट्रेन पकडण्याच्या तयारीत होते.