Badlapur Crime : दारु पिताना किरकोळ वाद झाला, मग दोघांकडून तरुणावर थेट गोळीबार

तिघे तरुण डोंगराच्या पायथ्याशी दारु पित बसले होते. दारु पित असताना एका तरुणाचा दोघांशी वाद झाला. यानंतर थेट गोळीबारच घडला.

Badlapur Crime : दारु पिताना किरकोळ वाद झाला, मग दोघांकडून तरुणावर थेट गोळीबार
किरकोळ कारणातून तरुणावर गोळीबार
Image Credit source: TV9
| Updated on: Jul 24, 2023 | 1:33 PM

बदलापूर / 24 जुलै 2023 : दारु पिताना झालेल्या किरकोळ वादातून दोघांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. बदलापूरच्या कात्रप पनवेल हायवेवर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुनील प्रजापती असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, गोळीबरात तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला आधी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि त्यानंतर कळवा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दारु पित असताना वाद झाला

सुनील प्रजापती हा तरुण शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास बदलापूर पनवेल हायवेजवळ डोंगराच्या पायथ्याशी मोकळ्या जागेत दारु पित बसला होता. यावेळी अन्य दोन तरुण त्याच्या शेजारी बसून दारु पित होते. दारु पिता पिता त्याचा शेजारी बसलेल्या दोन तरुणांसोबत काही कारणातून वाद झाला. या वादातून दोन अज्ञात तरुणांनी सुनीलवर गोळीबार केला. या गोळीबारात सुनीलच्या खांद्याला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे.

जखमी तरुणावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु

जखमी सुनीलला उपचारासाठी उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुनील हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पुढील तपास सुरु केला आहे. जखमी आणि आरोपींमध्ये नेमका काय वाद झाला याबाबत कळू शकले नाही. पोलीस चौकशी करत आहेत.