
देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले. या स्फोटामुळे फक्त राजधानीच नव्हे तर अख्खा देश हादरला असून त्या पार्शअवभूमीवर देशातील सर्व प्रमुख शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्फोटानंतर प्रत्येक राज्यातील प्रशासन अलर्ट झाला असून ठिकाठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील स्फोटामुळे देशातील नागरिकांच्या मनातही भीतीचं वातावरण आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील जळगाव येथे महानगरी एक्स्प्रेसमध्ये कोणीतरी खोडसाळपणा करत बॉम्ब असल्याची अफवा पसरवली आणि प्रवाशांचे धाबे दणाणले.
बॉम्ब फुटनेवाला है वाचून नागरिक दहशतीखाली
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरी एक्सप्रेस मध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली आणि भुसावळ जळगाव प्रशासन अलर्ट मोडवर आलं. महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये कोणीतरी खडूने विचित्र मेसेज लिहून ठेवला होता. ‘ पाकिस्तान जिंदाबाद आयएसआय जिंदाबाद, बॉम्ब फुटनेवाला है’ असा संदेश एका व्यक्तीने काळ्या खडूने एका टॉयलेटमधील भिंतीवर लिहून ठेवल्याचे उघड झाले. त्यानंतर ट्रेनमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले. ही माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट वर आलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा विभागाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने रेल्वेची कसून चौकशी करण्यात आली. तसेच बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलं व कसून तपासही केला गेला. रेल्वेतील अनेकांची तपासणी करण्यात आली. या खोडसाळ मेसेजनंतर यंत्रणा हाय अलर्ट वर असून अजूनही रेल्वेत प्रवाशांची चौकशी सुरू आहे. भुसावळ आणि जळगाव स्टेशनवर प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. रेल्वे विभागाने या घटनेचा दुजोरा दिला. मात्र कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे.
दिल्लीतील स्फोटांत 10 ठार, भयानक सीसीटीव्ही फुटेज समोर
10 नोव्हेंबर सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक लोक जखमी झाले. लाल किल्ल्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या स्फोटामुळे दिल्लीकर तसेच देशातील नागरिकही हादरले आहे. या स्फोटाची , त्यामागे हात असणाऱ्यांची पाळमुळे खणून काढण्यात तपास यंत्रणा व्यस्त असून याप्रकरणी देशाच्या अनेक भागात सतत छापे टाकले जात आहेत. स्फोट झाला त्या ठिकाणाहून फॉरेन्सिक टीमने असंख्य पुरावे गोळा केले आहेत. स्फोट झालेल्या i20 कारचे काही भाग, टायर, चेसिस, सीएनजी सिलेंडर, बोनेटचे भाग आणि इतर भाग असे अनेक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या स्फोटाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून भयानक फुटेजही समोर आलं आहे.