
मुंबई : सिरीअल किलर (serial killer) म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर भयावह चेहरा, निस्तेज डोळे, गंभीर भाव अशी आकृती डोळ्यासमोर येत असेल. खरं तर गुन्हेगाराला कुठलाही चेहरा नसतो, मात्र घडलेल्या बातम्या किंवा रंजक कथा वाचून आपल्या मनात एखादी प्रतिमा निर्माण झालेली असते. याच प्रतिमेला छेद देणारी खरी घटना 14 वर्षांपूर्वी घडली होती. कारण, निष्पाप दिसणारा चेहरा आणि वय अवघं आठ वर्ष. हो, आम्ही वर्णन सांगतोय जगाच्या गुन्हेगारी इतिहासातील सर्वात तरुण ज्ञात सिरीअल किलरचं (Youngest Serial Killer in the world)
जसं आपण म्हटलं, की गुन्हेगारी ही एक वृत्ती आहे, तिला चेहरा किंवा नाव नसतो. आपणही या चिमुरड्याचं नाव आणि फोटो यावर भर न देता त्याच्या क्रौर्याची कथा वाचूयात. तर या मुलाचं नाव राजेश असं मानुयात. राजेशची कथा तुमच्या अंगाचा थरकाप उडवेल, कारण त्याने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापर्यंतच तीन चिमुकल्या मुलींच्या हत्या केल्या होत्या. यामध्ये त्याच्या दोन बहिणींचाही समावेश होता.
नेमकं काय घडलं?
जून 2007 मध्ये संगीता नावाच्या महिलेमुळे या घटना प्रकाशझोतात आल्या. माझी मुलगी कामिनी बेपत्ता झाली आहे, आठ वर्षांच्या राजेशने तिची हत्या केली असावी, असा आरोप संगीताने स्थानिक पोलिसात केला. अवघ्या आठ वर्षांच्या मुलावर झालेल्या आरोपामुळे पोलिसही चक्रावून गेले. खरं तर इतक्या लहान मुलाला आरोपीच्या पिंजऱ्यात तरी कसं उभं करावं, या प्रश्नामुळे पोलीस बुचकळ्यात पडले. पण त्यांनी पीडित आईचं म्हणणं ऐकून घेतलं.
कामिनी बेपत्ता झाली, आणि…
बिहारमधील गावात राहणाऱ्या संगीताने नेहमीप्रमाणे आपल्या चिमुकल्या मुलीला म्हणजे कामिनीला शाळेत सोडलं आणि ती आपल्या नित्याच्या कामाला निघून गेली. तिला आणण्यासाठी परत येईपर्यंत आपल्या लेकीच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशी कल्पनाही तिच्या मनाला शिवली नव्हती. संगीता कामिनीला शाळेत आणण्यासाठी गेली, तेव्हा ती बेपत्ता होती. अत्यंत विरळ लोकसंख्या असलेल्या त्यांच्या छोट्याशा गावात एखादं मूल हरवण्याची शक्यताच कमी होती. म्हणजे, खेळत-बागडत गेलं असेल इथे-तिथे, असं कोणालाही वाटावं. पण राजेशबद्दल काही गोष्टी तिच्या कानावर आल्या होत्या, त्यामुळे तिने लागलीच त्याच्यावर संशय व्यक्त केला.
राजेशच्या चौकशीचं पोलिसांनाच दडपण
पुराव्यांच्या आधारे तपास करणाऱ्या पोलिसांचा साहजिकच या कानगोष्टींवर विश्वास नव्हता. आठ वर्षांच्या मुलावर अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवताना पोलिसांची प्रतिष्ठाच पणाला लागणार होती. खूप वेळ टाळाटाळ केल्यानंतर अखेर त्यांनी राजेश आणि त्याच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनला येण्यास फर्मावलं. राजेश आई-बाबांसोबत पोलीस स्टेशनला आला. निर्धास्त राजेशसमोर पोलिसांची अवस्थाच कशीनुशी झाली होती. कुठल्या तोंडाने हे विचारावं, अशी शरम त्यांना वाटत होती. पोलिसांनी बिचकतच विचारलं, की कामिनीबद्दल तुला काही माहित आहे का? यावर राजेशचं उत्तर ऐकून पोलिसांप्रमाणेच तुम्हीही चक्रावून जाल.
कामिनीच्या हत्येची कबुली
राजेश म्हणाला, अर्थातच मला कामिनी कुठे आहे, ते माहित आहे. मीच तिला मारलं आणि तिचा मृतदेह पुरला. राजेशचे शब्द ऐकून पोलीस चाट पडले होते. भल्याभल्या गुन्हेगारांकडून चटाचटा खून वदवून घेणारे पोलीस गपगार झाले होते. पोलिसांनी त्याला विचारलं, की तिचा मृतदेह कुठे आहे, हे सांगशील का. राजेश पोलिसांना घटनास्थळी घेऊन गेला. तिथे माती आणि पानांखाली कामिनीचं पार्थिव लपवलं होतं. राजेश ज्या प्रकारे थंड डोक्याने उत्तरं देत होता, ते पोलिसांना अवाक करणारं होतं. कामिनीचा गळा दाबल्यानंतर आपण तिच्या डोक्यात वीट घातली, असं राजेशने शांतपणे सांगितलं.
सख्ख्या धाकट्या बहिणीचीही हत्या
पोलीस या धक्क्यातून सावरत नाहीत, तोच राजेशने आणखी एक गौप्यस्फोट केला. कामिनी ही काही आपलं पहिलंच सावज नव्हती. तिच्याआधी आपण दोन खून केले आहेत. एक आपल्या सख्ख्या धाकट्या बहिणीचा, तर दुसरा चुलत बहिणीचा, असं त्याने पोलिसांना सांगितलं. दोघींचंही वय एक वर्षांपेक्षा कमी होतं. धक्कादायक म्हणजे या दोन्ही हत्यांबद्दल त्याच्या कुटुंबीयांनाही माहिती होती, मात्र ‘घरातली गोष्ट’ घरातच ठेवण्यासाठी त्यांनी हे गुपित दडवलं होतं.
राजेश सायकोपॅथ असल्याचं निदान
चौकशीदरम्यान राजेश अत्यंत मोकळ्याढाकळ्या पद्धतीने उत्तरं द्यायचा. एखाद्या सिनेमाचं कथानक सांगावं, तसं तो खुनाची पद्धत सांगायचा. कधी हसायचा-खिदळायचा. मध्येच बिस्किटंही मागायचा. राजेशच्या तपासणीसाठी मनोविश्लेषकांना (psychoanalyst) बोलावण्यात आलं होतं. राजेश हा सायकोपॅथ (psychopath) म्हणजेच मनोरुग्ण असल्याचं निदान तज्ज्ञांनी केलं होतं. इतरांना वेदना देऊन आनंद मिळवण्याची त्याला आवड होती, वयाच्या दुसऱ्या वर्षापासून त्याच्या मेंदूत तशी रचना झाली असावी, असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. हे अनुवंशिक असल्याचा कयासही डॉक्टरांनी वर्तवला होता.
राजेशचे वय 18 वर्षांखालील होते, म्हणजेच तो अल्पवयीन होता. त्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. बाल गुन्हेगारांना दीर्घकालीन शिक्षेची तरतूद त्यावेळी कायद्यात नसल्याने त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या राजेश कुठे आहे, काय करतो, याची कुठेच माहिती उपलब्ध नाही. पण तुरुंगवास भोगल्यानंतर जगात वावरताना आणखी कोणाचे बळी त्याने घेतले नसतील, अशी अपेक्षा आहे.
(Know about Youngest Serial Killer in the world)