
कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि खंडणीसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांतर्गत आरोपी असलेल्या कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर यवतमाळ पोलिसांच्या हाती लागला आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळमध्ये वास्तव्याला होता. भूपेंद्र सिंग ऊर्फ रघु ऊर्फ भिंडार असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर पंजाब राज्यात 15 तर राजस्थानमध्ये एक गुन्हा दाखल आहे. पंजाबमधील खुनाच्या गुन्हात तो दोषी आहे. तर राजस्थानच्या बाडमेरमध्ये खून करून तो यवतमाळमध्ये वास्तव्याला आला होता. यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं या मोस्ट वॉन्टेड गँगस्टरला पकडलंय.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानंतर शहरात अमली पदार्थविरोधी मोहिम राबवत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की भुपेंद्र सिंग यवतमाळ शहरातील जांब रोड परिसरामध्ये स्वतःची ओळख लपवून राहत आहे. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकण्याची काटेकोर योजना आखून संशयित इसमाच्या घराभोवती घेराव घातला. यावेळी आरोपीला पोलिसांची चाहूल लागली आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच पोलिसांनी त्यांना पकडलं आणि जेरबंद केलं.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि बिन्नी गुज्जर गॅगचा गुंड असल्याची कबुली दिली. इतकंच नव्हे तर पंजाब आणि राजस्थानमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अॅक्ट अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांत सहभाग असल्याचंही त्याने मान्य केलं. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने पंजाब आणि राजस्थान पोलिसांशी संपर्क साधून त्याच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती घेण्यात आली. यादरम्यान भूपेंद्रविरोधात 17 गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समजतं. यवतमाळ पोलिसांनी बाडमेर, राजस्थान जिल्हा पोलीसांशी तात्काळ समन्वय साधून गुन्हेगाराविषयी तसंच गँगविषयी संपूर्ण माहिती संकलीत केली.
आरोपीला यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात 20 वर्षे आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दहा वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोन्ही गुन्ह्यात तो फरार असतानाच त्याने बाडमेर इथं सुपारी घेऊन हरपालसिंग ऊर्फ रिंकू याची हत्या केल्याची माहिती पंजाब आणि राजस्थान पोलिसांकडून मिळाली. त्याच्यावर पंचवीस हजार रुपयांचं बक्षीसदेखील होतं.
बिष्णोई आणि गुज्जर गँग ही भारतातील महत्वाची आणि गुन्हेगारी जगतातील कुख्यात गँग आहे. या गँगद्वारे कॉन्ट्रॅक्ट किलिंग, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे घडविण्यासाठी गँगस्टर्सना वाहनं, शस्त्रं पुरवून गुन्हे घडवून आणले जातात. इतकंच नव्हे तर गुन्ह्यानंतर आरोपीला फरार होण्यासाठी पुरेशी रक्कम पुरवून गुन्हा कुठे आणि कोणाविरूद्ध करायचा याबाबत त्यांना वेळेवर माहिती देऊन गुन्हा घडवून आणला जातो. तसंच अशा प्रकारचे गँगस्टर गुन्हा करून फरार असताना त्यांना पुन्हा पुढील गुन्हा करेपर्यंत ओळख लपवून राहण्याकरता महिन्याला 20 ते 25 हजार रूपये आर्थिक मदत करण्यात येते. याबाबत सखोल माहिती घेतली असता ताब्यातील आरोपीला अमेरिकेतून सौरभ गुज्जर हा डॉलरमध्ये मनी ट्रान्सफरच्या मदतीने मागील तीन वर्षांपासून पैसे पाठवत असायचा. सौरभ गुज्जर हा गँगस्टर बिल्लू गुज्जर याचा भाऊ तसंच गोल्डी ब्रार याचा मित्र आहे. आरोपी भविष्यात कोणताही गुन्हा करण्यासाठी तयार राहील यासाठी सौरभ गुज्जर हा महिन्याला त्याला पैसे पुरवायचा असंही निष्पन्न झालं आहे.
आरोपी भूपेंद्र सिंग हा यवतमाळमधील दांडेकर लेआऊट इथं भाड्याची खोली घेऊन राहत होता. त्याची विवाहित पत्नी देखील त्याच्यासोबत होती. आपण राजस्थानी मारवाडी असून माहूर इथं ढाबा चालवत असल्याचं तो परिसरातील लोकांना सांगायचा. एकेदिवशी दारू पित असताना त्याने एका युवकाला आपण गुन्हेगार असल्याचं सांगून धमकावलं होतं. हीच माहिती खबरीने पोलिसांना दिली होती.