
महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला पंजाबमध्ये शस्त्र तस्करी प्रकरणी अटक झाली आहे. सिकंदरला जाणीवपूर्वक गोवले जात असल्याचा त्याच्या वडिलांनी आरोप केला आहे. “लवकरच हिंदकेसरी स्पर्धा होणार आहे. त्यामुळे त्या स्पर्धेत खेळू नये म्हणून सिकंदरला खोट्या गुन्ह्यात अडकवले. सिकंदर किंवा आमच्या कुटुंबावर यापूर्वी कधीही गुन्हा दाखल झालेला नाही. आम्ही गरीब माणसं आहोत” असं सिकंदर शेखचे वडील म्हणाले. “महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी पंजाब सरकारला याबाबत सांगावे. सिकंदरने कुस्तीतील सर्व पदकं पटकावली आहेत. त्याला ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून द्यायचे आहे” असं सिकंदरचे वडील रशीद शेख म्हणाले.
सीआयए टीमने पपला गुर्जर गँगच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत चार लोकांना अटक झाली आहे. यात सिकंदर शेख एक आहे. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल (0.45 बोर), चार पिस्तुल (0.32 बोर), काडतूस, स्कॉर्पियो-एन आणि एक्सयूवी सारख्या दोन गाड्या जप्त केल्या. या प्रकरणात खरड़ (पंजाब) पोलीस ठाण्यात आर्म्स एक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विक्रम उर्फ पपला गुर्जर गँगशी थेट संबंधित
एसएसपी हरमन हंस यांनी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सांगितलं की, अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रीय आहेत. विक्रम उर्फ पपला गुर्जर गँगशी थेट संबंधित आहे. आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब आणि आसपासच्या भागात शस्त्रास्त्र पुरवठा करत होते. ही माहिती मिळाल्यानंतर कारवाई झाली. तिन्ही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं समजलं. महाराष्ट्राच्या सोलापुर जिल्ह्यात सिकंदर शेखच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.
सिकंदर शेख कोण?
या घटनेतील मुख्य आरोपी दानवीरवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात हत्या, दरोडा, एटीएममध्ये तोडफोड, आर्म्स एक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. तो पपला गुर्जर गँगचा सक्रीय सदस्य आहे. यूपी, मध्य प्रदेशातून शस्त्र आणून पंजाबमध्ये पुरवठा करण्याचं काम करतो. सिकंदर शेख एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा कुस्तीपटू आहे. तो आर्मीत खेळाच्या कोट्यातून भरती झाला. पण काही काळाने त्याने नोकरी सोडली. तो बीए ग्रॅजुएट आहे, विवाहित आहे आणि मागच्या पाच महिन्यांपासून मुल्लांपुर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता.