
पैशांच्या लोभ असलेली व्यक्ती कोणत्या थराला पोहोचेल काय सांगता येत नाही. आजपर्यंत अशी अनेक उदाहरणं तुम्ही आजूबाजूला पाहिली असतील. असंच एक उदाहरण फरीदाबाद येथे घडलं आहे. ही बातमी वाचून तुमची स्थिती हसावं की रडावं अशी होईल. एका मुलाने पैशांच्या लोभासाठी जिवंत बापाचं श्राद्ध घालण्याचा घाट घातला. महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत बापाचा मृत्यू झाला असा बनाव करण्यासाठी त्याने सर्व प्लान आखला होता. कारण तसं भासवून त्याला सरकारकडून 25 लाख रुपये मिळवायचे होते. पण वडिलांना मुलाचा हा बनाव लक्षात आला आणि त्याने त्याची पोलखोल केली. तसेच धक्कादायक खुलासाही केला. हे प्रकरण वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. हे प्रकरण पन्हेरा कला गावचं आहे. 3 ऑगस्टला गावात ढोलनगारे आणि जेवण वाटून 79 वर्षांच्या लालचंद उर्फ लूला यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. हे सर्व आयोजन लालचंदचा मुलगा राजेंद्रने केलं होतं. गावात 50हून अधिक पोस्टर लावले आणि वडिलांच्या निधनाची बातमी पसरवली. गावातील मंदिरात जेवण दिलं आणि पूर्ण गावात शोकयात्रा काढली. यात राजेंद्र नाचताना दिसला.
लालचंदचा मुलगा राजेंद्रने दावा केला की, ‘माझे वडील 9 महिन्यांपूर्वी गोवर्धन परिक्रमेसाठी सायकलने निघाले होते. तेथून ते वाराणसीला गेले आणि मग महाकुंभ मेळ्यात गेले. महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला. मी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण माझ्या वडिलांची काही बातमी हाती लागली नाही. त्यानंतर मी ग्रामस्थांच्या सल्ल्यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला.‘ पण वास्त काही वेगळंच होतं. कारण त्याचे वडील जिवंत होते. तसेच उत्तर प्रदेशच्या कोसीकला गावात आपल्या भावासोबत त्याच्या घरी राहात होते. एका नातेवाईकाने श्रद्धांजलीचा व्हिडीओ पाहिला आणि बनाव उघड झाला.
नातेवाईकाने हा व्हिडीओची माहिती दिली. त्यानंतर लालचंने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि गावच्या सरपंचांना पाठवला. तसेच गावची ग्रामसभा बोलवली. लालचंदच्या मते, त्यांचा मुलगा त्यांना मारू इच्छित होता. तो रोज मला मारायचा. जेवण द्यायचा नाही आणि नोकरासारखं वागवायचा. त्याने माझी अडीच एकर जमिन लाटली आहे. त्यावर आश्रम बनवलं आहे. ग्रामस्थांच्या मते, राजेंद्र या प्लानच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाख रुपये लाटण्याच्या प्रयत्नात होता. महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना सरकार पैसे देते. वडिलांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून त्याने या योजनेचा लाभ उचलण्याचा प्लान आखला होता.
या प्रकरणानंतर गावातील शिवमंदिरात ग्रामसभा बोलवण्यात आली आणि त्यात लालचंदने सर्व काही उघड केलं. ग्रामसभेने या प्रकरणाची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. तसेच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. माहितीनुसार, राजेंद्रने हॉटेल मॅनेजमेंट करून 1995 ते 200 सालापर्यंत दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलात नोकरी केली. त्यानंतर इव्हेंट कंपनी सुरु केली. पण 2010 पासून स्वत:ला स्वामी म्हणून घोषित केलं. तसेच वडिलांच्या जमिनीवर आश्रम टाकला आणि तिथे पत्नी-मुलांसोबत राहात होता.