
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर जी प्रतिक्रिया दिली त्यावरुन मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “सैफ अली खानवर हल्ला झाला. त्याला काही लोकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. सैफ अली खान मुसलमान आहे म्हणून त्याच्यावरती हल्ला झाला. चोर काय जात बघून कोणावर हल्ला करतो का?”, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला.
“काही जातीय रंग देतात. अशा मूर्खपणाची स्टेटमेंट होतात. तेव्हा राग येतो. बाबासाहेबांच्या घटनेने अधिकार सगळ्यांना सारखे दिले आहेत. जो कोणी आरोपी असेल त्याला अटक करा. फासावर लटकवायचे तर लटकवा. मात्र जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करू नका. जातीच्या आधारावरती स्वतःचं राजकारण करण्यासाठी जे काय प्रयत्न तुम्ही करताय ते लोकांना आता आवडत नाही. सैफ अली खान असेल, शाहरुख खान असेल किंवा आणखी कोण असेल, त्यांना भारताच्या जनतेने मोठं केलं आहे. त्यांच्या जीवावर ते मोठे झाले आहेत. हल्ला झाला की राजकीय रंग देऊन जातीवर घेऊन जाता ही योग्य पद्धत नाही”, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी सुनावलं.
“पोलिसांनी तपास सुरू करायच्या आधीच 30 तास झाले अजून आरोपी का पकडले गेले नाही? पोलीस का देव आहेत का? त्यांना देखील शोधावे लागतात. आरोपी मुंबई शहरामध्ये कुठे लपला असेल माहिती आहे का? तरी एक आरोपी पकडला गेलेला आहे. आता तुम्ही तोंड का उघडत नाही? पोलिसांचं मनोधैर्य खचवण्याचं काम आपण करू नये. पोलिसांना सपोर्ट केला पाहिजे. तपासामध्ये कुणीही अडथळे आणू नये. ही आमची भूमिका आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.
“माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या आरोपींना अटक केलीय. आरोपींचा छडा लावलाय. झालेली घटना ही दुर्दैवी आहे. कोणीही त्याचं समर्थन करणार नाही. आरोपी कोणत्याही जातीपातीचा असो, बीडमध्ये सरपंच देशमुख यांचा खून झाला. तेव्हा कोणी समर्थन केलं नाही. निषेधच केलेला आहे. अशा घटनांचा निषेध केला. आम्ही समाजाचे सेवक म्हणून आमची भूमिका सर्वांना सामावून घेण्याची असते. पोलीस आपलं काम करतात”, असं संजय शिरसाट म्हणाले.
“वाल्मिक कराड याच्या विरोधात जे काही विरोधक बोलत आहेत ना, सगळं पोलीस तपासात आहे. वाल्मिक कराडची प्रॉपर्टी काढली गेलेली आहे. त्याने काय-काय केलं ते काढत आहेत. पोलीस पूर्ण ताकद लावून तपास करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, कुणीही असला तरी त्याला माफ करणार नाही. ही शासनाची भूमिका आहे. वाल्मिक सारख्या दादांना आता जेलमध्ये जावं लागेल. आता पाच वर्ष जेलच्या बाहेर नाहीत. त्याला मोका लावलाय. देशमुखांचे मारेकरी सुटणार नाहीत ही सरकारने घेतलेली भूमिका आहे. अत्यंत योग्य दिशेत झालेला तपास आहे, असं आमचं मत आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.