
मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : शहरातील गुन्हेगारीच्या (crime news) घटना वाढत असून आता लोकांना लुटण्यासाठी भामटे चक्क पोलिसांच्या (fake cops) वेषात येत असल्याचे दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलिस असल्याचे भासवत काही चोरट्यांनी एका व्यापाऱ्याला लुटल्याची (looted businessman) घटना घडली आहे. विक्रोळीजवळ हा प्रकार घडला. बोरिवली येथे राहणारा एक व्यापारी त्याच्या घराकडे निघालेला असताना पोलिसांच्या वेशात आलेल्या तीन जणांनी त्याला विक्रोळीजवळ रस्त्याच्या मधोमध अडवले. अधिकृत कारणासाठी त्याच्या वाहनाची “तपासणी” करण्याच्या बहाण्याने, त्यांनी त्याचे दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि कारची चावी चोरली. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेनंतर अवघ्या ४५ मिनिटांनी चोरट्यांनी त्या इसमाच्या पत्नीला फोन केला आणि चोरलेल्या सर्व वस्तू मुलुंड येथील ब्रीजवर टाकल्याचे सांगत ते फरार झाले.
नक्की काय झालं ?
चोरीची ही अजीब-गजब घटना शुक्रवारी रात्री घडली. रमेश कांतिलाल गाडा असे तक्रारदार इसमाचे नाव असून ते त्यांच्या कारने ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून वाशीहून बोरिवली येथे निघाले होते. त्यांच्या सांगण्यानुसार, एक कार सतत त्यांचा पाठलाद करत होती काही वेळाने ते जेव्हा विक्रोळी (EEH) गोदरेज सिग्नलवर पोहोचले, तेव्हा कारने त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक केले आणि समोरचा रस्ता अडवला.
खोटी तपासणी करत लुटल्या वस्तू
तेव्हा कारमध्ये पाच लोक बसले होते, त्यातले तिघे खाली उतरले. त्यांनी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो असलेला मास्क घातला होता आणि आपण पोलिस असल्याचे सांगत त्यांनी मला तपासणीसाठी कारमधून बाहेर पडण्यास सांगितले, असे गाडा यांनी नमूद केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या बोगस पोलिसांनी गाडा यांना सांगितले की ते अवैध व्यवसायात गुंतले असून त्यातील काही सामान त्यांच्या कारमध्ये आहे. त्यासंदर्भात टीप मिळाल्याने त्यांना कारची तपासणी करायची असल्याचेही भामट्या पोलिसांनी सांगितले. त्या कारमध्ये असलेला लॅपटॉप तसेच गाडा यांच्याकडे असलेले दोन फोन तसेच त्यांच्या कारची चावी, अशा सर्व गोष्टी त्यांनी ताब्यात घेतला आणि गाडा यांना पोलिस स्टेशनला येण्यास सांगितले. गाड त्यांच्या कारपर्यंत पोहोचेपर्यंतच ते तिथून फरार झाले आणि आपण लुटले गेले आहेत, हे गाडा यांच्या लक्षात आले.
चोरीच्या वस्तू का टाकल्या ?
लूट झाल्याचे समजल्यावर गाडा यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या इसमाची मदत घेऊन त्यांच्या भावाला फोन लावला आणि कारची डुप्लिकेट चावी आणण्यास सांगितले. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हे सर्व होत असतानाच सुमारे पाऊण तासाने (45 मिनिटे) गाडा यांच्या पत्नीला एका इसमाकडून फोन आला आणि मुलुंड ब्रीज येथे एका बॅगेत दोन मोबाईल, कारची चावी आणि लॅपटॉप (लुटलेल्या वस्तू) सापडल्याचे त्याने सांगितले. तेव्हा गाडा यांच्या पत्नीने लगेच दिराला फोन करून ही माहिती दिली, ज्यानंतर गाडा व त्यांचा भाऊ दोघेही मुलुंड ब्रीजवर पोहोचले. त्यांनी त्यांच्या वस्तू तर ताब्यात घेतल्याचे पण पोलिसांनाह याची माहिती दिली.
याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या लुटीमागे नेमका काय हेतू होता, लुटल्यावर गाडा यांचं सामान परत का केलं, याचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत. यामागे कोणाचा काय हेतू आहे, याचाही तपास सुरू आहे.