नवाब मलिकांची प्रकृती कशी आहे ?, ईडी म्हणते…

| Updated on: Sep 22, 2022 | 10:53 PM

नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणावरुन जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर गुरुवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्यापुढे सुनावणी झाली.

नवाब मलिकांची प्रकृती कशी आहे ?, ईडी म्हणते...
नवाब मलिक
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सत्र न्यायालयात सुनावणी (Hearing) झाली. यावेळी मलिक यांच्या वकिलांनी जामिनाच्या समर्थनार्थ जोरदार युक्तिवाद केला. याचवेळी अंमलबजावणी संचालनालय ऊर्फ ईडीने अर्ज दाखल करून मेडिकल बोर्ड (Medical Board) स्थापन करण्याची विनंती केली. न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी मलिक यांचे युक्तिवाद आणि ईडीच्या अर्जाची दखल घेतली.

गेल्या चार महिन्यांपासून मलिकांवर उपचार सुरु

मलिक यांची प्रकृती कशी आहे, याची तपासणी करण्यासाठी मेडिकल बोर्ड स्थापण्याची विनंती ईडीने केली आहे. मलिक हे मागील चार महिन्यांपासून कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मनी लाँड्रिंग प्रकरणी 23 फेब्रुवारीला केली होती अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या काही जवळच्या साथीदारांविरुद्ध 14 फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारीला ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. मनी लाँड्रिंगचा खटला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे.

हे सुद्धा वाचा

जामीन अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी

नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणावरुन जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर गुरुवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी ईडीने मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. तसेच मलिक यांच्या प्रकृतीसंबंधी पडताळणी करण्यासाठी मेडिकल बोर्ड स्थापन करण्याची विनंती केली.

गेल्या महिन्यात होऊ शकल्या नाहीत चाचण्या

न्यायालयाने चालू महिन्याच्या सुरुवातीला मलिक यांची किडनी कशाप्रकारे काम करतेय हे जाणून घेण्यासाठी रेनल स्कॅन करण्यास परवानगी दिली होती. यासंबंधी गेल्या महिन्यात त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार होत्या. मात्र यादरम्यान ते अनफिट आढळल्याने त्या चाचण्या होऊ शकल्या नाहीत.

मलिकांच्या प्रकृतीचा अहवाल वेळोवेळी विशेष न्यायालयासमोर सादर

खासगी रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल वेळोवेळी विशेष न्यायालयासमोर सादर केला आहे. जे. जे. रुग्णालयाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचा अहवाल दिल्यानंतर त्यांना 13 मे रोजी कुर्ला येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांना मूत्रपिंडाचे स्कॅन करण्याची परवानगी दिली होती. परंतु त्यांना ताप आणि आरोग्याच्या इतर समस्या असल्याने त्यांची चाचणी होऊ शकली नव्हती.

रेनल स्कॅन ही किडनीचा आकार, मोजमाप आणि कार्य तपासण्यासाठी केलेली न्यूक्लियर इमेजिंग चाचणी आहे. ही चाचणी मूत्रपिंडात रक्त प्रवाह तपासण्यासाठी देखील केली जाते.