VIDEO : उल्हासनगर शहरात गावगुंडांचा हैदोस, 10 हजाराचा हप्ता न दिल्यानं व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला

| Updated on: Sep 14, 2021 | 12:08 AM

"तू धंद्यात खूप पैसे कमावतो, मला दर महिना 10 हजार हप्ता द्यायचा", असा दम या गुंडाने धीरज वलेचा यांना दिला होता. मात्र धीरजने हप्ता द्यायला नकार दिल्याने आरोपी नवीन केशवानी याला राग आला.

VIDEO : उल्हासनगर शहरात गावगुंडांचा हैदोस, 10 हजाराचा हप्ता न दिल्यानं व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला
उल्हासनगर शहरात गावगुंडांचा हैदोस, 10 हजाराचा हप्ता न दिल्यानं व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला
Follow us on

उल्हासनगर (ठाणे) : महिन्याला दहा हजाराचा हप्ता दिला नाही, म्हणून एका व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. इतकंच नव्हे, तर व्यापाऱ्याच्या घरावर बियर आणि कोल्ड्रिंक्सच्या भरलेल्या बॉटल्सनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

धीरज वलेचा असं या व्यापाऱ्याचं नाव असून उल्हासनगरच्या कॅम्प ४ मध्ये त्यांचं किराणा दुकान आहे. याच परिसरात नवीन केशवानी हा गावगुंड सुद्धा राहतो. “तू धंद्यात खूप पैसे कमावतो, मला दर महिना 10 हजार हप्ता द्यायचा”, असा दम या गुंडाने धीरज वलेचा यांना दिला होता. मात्र धीरजने हप्ता द्यायला नकार दिल्याने आरोपी नवीन केशवानी याला राग आला. यातूनच त्याने आपल्या इतर तीन साथीदारांसोबत धीरजच्या घरावर बियर आणि कोल्ड्रिंक्सच्या भरलेल्या बाटल्यांनी हल्ला चढवला.

आरोपींचा शोध सुरु

या हल्ल्यात कुणालाही इजा झाली नाही. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र या घटनेनंतर धीरज वलेचा हे दहशतीखाली आहेत. या गुंडांना अटक करण्याची मागणी त्यांनी केलीय. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतायत.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

शस्त्राच्या धाकाने तोडफोड करत लूट, नागपुरात भरदिवसा दोन गुंडांचा हैदोस

दुसरीकडे गेल्या आठवड्यात नागपुरात दोन गुंडांच्या हैदोसाचा प्रकार उघडकीस आला होता. नागपूरच्या गजबजलेल्या माणेवाडा परिसरात दोन गुंडांनी भर दिवसा हैदोस घातला. शस्त्राचा धाक दाखवत तीन ठिकाणी तोडफोड करुन गुंडांनी लूटमार केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. पोलिसांनी दोन्ही गुंडांच्या मुसक्या आवळल्या होत्या. हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

हातात शस्त्र घेऊन दोन गुंड एका बाईकवरून आले. त्यांनी हॅपी फूड नावाच्या दुकानावर पहिला हल्ला चढवला. त्यात त्यांनी नागरिक आणि दुकानदाराला धमकावत रक्कम लुटली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे गुंडांचा शोध

त्यानंतर गुंडांनी एका पेट्रोल पंपावर हल्ला बोल केला, मात्र तिथे त्यांना लूट करता आली. पुढे एका तंदूर सावजी नावाच्या दुकानात ते पोहोचले आणि तिथेही त्यांनी हंगामा केला आणि पळून गेले. याची माहिती मिळताच तिन्ही ठिकाणी पोलीस पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फूटेजचा आधार घेत या गुंडांचा शोध सुरु केला.

हेही वाचा :

सांगलीच्या महिला व्यावसायिकाला लुबाडलं, दुबईतल्या कंपनीकडून दीड कोटींची फसवणूक, पोलीस आरोपींच्या मुसक्या कशा आवळणार?

धक्कादायक! आधी डोक्याचे केस धरून स्लॅपवर आदळलं, नंतर वीटच डोक्यात घातली, युवकाच्या हत्येनं औरंगाबाद हादरलं