Mumbai Crime | मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून नातीचे लैंगिक शोषण, 70 वर्षीय आजोबांना तुरुंगवास

| Updated on: May 16, 2022 | 8:03 AM

सप्टेंबर 2014 मध्ये तक्रारदार महिला काही कामानिमित्त बाहेर गेली होती. ती परत आली तेव्हा आपले सावत्र वडील तिच्या मुलीला चुकीच्या पद्धतीने पकडून ठेवत फोनवर काही व्हिडीओ दाखवत असल्याचे तिने पाहिले.

Mumbai Crime | मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून नातीचे लैंगिक शोषण, 70 वर्षीय आजोबांना तुरुंगवास
एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी नाही
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मुंबईतील एका विशेष न्यायालयाने (Mumbai Special Court) 70 वर्षीय वृद्ध आजोबाला आपल्या 13 वर्षांच्या सावत्र नातीचे लैंगिक शोषण (Assault) करणे आणि मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ दाखवल्याप्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीचे वय आणि आजारपण हे त्याच्याबाबत उदारता दाखवण्याचे कारण ठरु शकत नाही. आरोपीने पीडितेची फसवणूक करुन (Crime News) तिला उद्ध्वस्त केले. हे तिच्या संपूर्ण आयुष्यावर (वैवाहिक जीवनासह) डाग देईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

यावेळी विशेष न्यायाधीश म्हणाले की, ‘अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित गुन्ह्याला पुरेशी शिक्षा देऊन हाताळले पाहिजे. बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार हा केवळ महिलांविरुद्धचा गुन्हा नाही, तर समाजाविरुद्धही हा गंभीर गुन्हा आहे. आपली वासना पूर्ण करु पाहणाऱ्या हल्लेखोरांसाठी पीडिता सोप्या शिकार ठरतात. आरोपीने निकटवर्ती असलेल्या चिमुरडीला लुटले.’

काय आहे प्रकरण?

आरोपीच्या सावत्र मुलीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तर पीडित बालिका ही तिची सख्खी मुलगी आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर 2014 मध्ये ती काही कामानिमित्त बाहेर गेली होती. ती परत आली तेव्हा आपले सावत्र वडील तिच्या मुलीला चुकीच्या पद्धतीने पकडून ठेवत फोनवर काही व्हिडीओ दाखवत असल्याचे तिने पाहिले. महिलेची नजर पाहून सावत्र बाप बालिकेला सोडून निघून गेला. संशयाच्या कारणावरुन महिलेने मुलीकडे विचारणा केली असता तिने सांगितले की, तिचा सावत्र आजोबा तिचे लैंगिक शोषण करत असत आणि मोबाईलवर तिला अश्लील व्हिडीओ दाखवत असत.

हे सुद्धा वाचा

आरोपीचा बचाव काय?

दुसरीकडे कौटुंबिक वादामुळे आपल्याविरुद्ध खटला पुन्हा सुरु झाल्याचा बचाव आरोपीच्या बाजूने करण्यात आला. सावत्र मुलीने मागितलेले 25 हजार रुपये आपण दिले नसल्याचे आरोपीने सांगतिले. मात्र, अनेक साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे पाहता न्यायालयाने वैद्यकीय अहवाल तपासला, ज्यात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली.

यावेळी न्यायाधीश शेंडे यांनी मुलीने लैंगिक अत्याचाराबाबत यापूर्वी का सांगितले नाही, या मुद्द्यावर लक्ष वेधले. पीडितेची वैद्यकीय चाचणी हा सबळ पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. तिने आधी खुलासा न केल्यामुळे तिची साक्ष नाकारण्याचे कारणच नाही. अशा हल्ल्यांना बळी पडून वर्षानुवर्षे गप्प बसणे ही आपल्या समाजात नवीन गोष्ट नाही, यावरही न्यायाधीशांनी जोर दिला.

36 पानी निकालपत्र

त्यांनी आपल्या 36 पानी निकालपत्रात म्हटले आहे की, ‘या प्रकरणातील पीडितेचे म्हणणे आहे की, जर तिने याबाबत कोणाला सांगितले असते, तर तुझ्या आई-वडिलांना जीवे ठार मारुन टाकेन, अशी धमकी आरोपीने तिला दिली होती, त्यामुळे तिच्यावर दबाव निर्माण झाला. त्यामुळे तिने आरोपीचा निर्लज्ज आणि विकृत चेहरा उघड केला नाही’

‘आपल्या समाजात हे नवीन नाही. अपमान, कौटुंबिक सन्मान इत्यादी गोष्टींच्या भीतीने कुटुंबं तोंड बंद ठेवतात असे अनेक वेळा घडते. लहानपणी त्यांच्यासोबत झालेल्या अशा कृत्यांचे पडसाद मोठ्यांच्या पाठिंब्याअभावी त्यांना सहन करावे लागतात. मोठे झाल्यावर त्यांच्या भावना काय असतील, ते खरोखरच अशा मोठ्यांचा आदर करतील का?’ असा प्रश्नही न्यायाधीशांनी उपस्थित केला.