मोबाईल घ्यायला गेला, बोलण्यात गुंतवत दोन महागडे मोबाईल खिशात, सीसीटीव्हीत चोरट्याचा कारनामा कैद

| Updated on: Sep 05, 2021 | 2:42 PM

बदलापुरात दुकानात मोबाईल विकत घेण्याच्या बहाण्याने चोरटा मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर पश्चिमेला घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मोबाईल घ्यायला गेला, बोलण्यात गुंतवत दोन महागडे मोबाईल खिशात, सीसीटीव्हीत चोरट्याचा कारनामा कैद
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

बदलापूर (ठाणे) : बदलापुरात दुकानात मोबाईल विकत घेण्याच्या बहाण्याने चोरटा मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर पश्चिमेला घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मोबाईल दुकानदाराने त्याला पकडण्याचा प्रयत्न देखील केला. पण तो हाती लागला नाही. पोलीस या मोबाईल चोराचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

बदलापूर पश्चिमेला नीरज मिश्रा यांचं श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे. या दुकानात 1 सप्टेंबर रोजी एक चोरटा मोबाईल विकत घेण्यासाठी आला. त्याचा साथीदार दुकानाच्या बाहेरच गाडी चालू करुन थांबला होता. यावेळी या चोरट्याने मोबाईल बघता-बघता विवो कंपनीचे दोन मोबाईल घेऊन धूम ठोकली. यानंतर साथीदारासह तो बदलापूर स्टेशनच्या दिशेनं पळून गेला.

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

चोरटा पळून जात असताना दुकानातल्या मुलाने त्याला पकडण्याचाही प्रयत्न केला. मात्र चोरटे पळून गेले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

अंबरनाथमध्ये भंगारवाल्या महिलेने घरातील पँट चोरत पैसे लुबाडले

दुसरीकडे ठाणे जिल्ह्यामधीलच अंबरनाथ शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. घरात लटकवलेली पँट भंगारवाल्या महिलांनी चोरुन नेल्याची घटना अंबरनाथ शहरात घडली आहे. या पँटमध्ये असलेला मोबाईल, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रं हेदेखील महिलांनी लंपास केलं. याशिवाय एटीएम कार्ड वापरुन बँक खात्यातील सर्वच्या सर्व म्हणजे साडेआठ हजार रुपयांची रोकडही काढून घेतली. चोरीची ही घटना देखील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

घराच्या उघड्या दरवाजातून आत शिरल्या

अंबरनाथ पूर्वेच्या आंबेडकर नगर भागात शनिवारी सकाळी ही घटना घडली. सकाळी सात वाजताच्या सुमारास दोन भंगारवाल्या महिला या परिसरात फिरत होत्या. त्यावेळी त्यांचं लक्ष बाळासाहेब लिंबाळे यांच्या घराकडे गेलं. या घराचा दरवाजा उघडा असल्यानं महिला घरात शिरल्या. त्यांनी घरात जाऊन दरवाजाला लटवकलेली पॅण्ट चोरली आणि पोबारा केला.

ही सगळी घटना या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या पँटमध्ये लिंबाळे यांचा मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रं होती.

एटीएम कार्डवरच पासवर्ड लिहिणं महागात

धक्कादायक बाब म्हणजे एटीएम कार्डाचा पासवर्ड सुद्धा कार्डासोबत लिहून ठेवलेला असल्यानं या महिलांनी एटीएम कार्ड वापरून लिंबाळे यांच्या अकाऊंटमध्ये असलेले सर्वच्या सर्व पैसे म्हणजे साडेआठ हजार रुपये काढून घेतले. त्यामुळे लिंबाळे यांचं मोठं नुकसान झालं आहे.

महिलांचा शोध सुरु

यानंतर आता या महिलांना पकडण्याची मागणी लिंबाळे यांनी पोलिसांकडे केली आहे. तर पोलिसांनी लिंबाळे यांच्या तक्रारीनुसार या महिलांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा :

शस्त्राच्या धाकाने तोडफोड करत लूट, नागपुरात भरदिवसा दोन गुंडांचा हैदोस

सेक्स चेंज ऑपरेशनसाठी पैसे न दिल्याचा राग, गे पार्टनरच्या साथीने हत्या, हरियाणातील सामूहिक हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा