
राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्का दायक घटना समोर आली आहे. एका व्यावसायिकाने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. अमित शांतीलाल चोप्रा असं या व्यावयासिकाचं नाव आहे. व्यावसायिक कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, अमित शांतीलाल चोप्रा हे मंगळवारी मध्यरात्री टॅक्सीने जात होते. त्यांची टॅक्सी वांद्रे-वरळी सीलिंकवर येताच त्यांनी साप सावल्याचा आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरून टॅक्सी चालकाने टॅक्सी बाजूला थांबवली. त्यानंतर चोप्रा यांनी टॅक्सीचा दरवाजा उघडला व त्यांनी सीलिंकवरून समुद्रात उडी मारत आत्महत्या केली. या प्रकारामुळे टॅक्सी चालक घाबरला व त्याने तात्काळ हा प्रकार सीलिंक कर्मचारी व पोलिसांना सांगितला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अमित यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना त्यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी सापडली नाही, त्यामुळे कुटुंबियांकडे चौकशी केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी अधिकच्या तपासाला सुरुवात केली आहे.
व्यावसायिक अमित शांतीलाल चोप्रा (47) यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. चोप्रा हे मुळचे राजस्थान येथील रहिवासी असून त्याचे सर्व नातेवाईक तेथे वास्तव्याला आहेत. चोप्रा पत्नी व मुलांसोबत मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे राहत होते. त्यांचा मुंबईतच इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता चोप्रा यांनी टॅक्सी पकडली. वांद्रे मार्गे टॅक्सी सीलिंकवर आल्यानंतर आपल्याला साप चावला असा आरडाओरडा चोप्रा यांनी केला आणि खाली उतरून आत्महत्या केली.
आता पोलिसांनी चोप्रा यांच्या आत्महत्येचा तपास सुरु केला आहे. आगामी काळात त्यांच्या नातेवाईकांची आणि मुलांचीही चौकशी करण्यात येणार आहे. चोप्रा हे आर्थिक अडचणीत होते का? त्यांना इतर काही समस्या होत्या का? या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधत आत्महत्येचे कारण शोधले जाणार आहे.