
ब्रिजभान जैस्वार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या मर्मस्थळावर पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला करून नरसंहार घडविला होता. या घटनेला काल (रविावर) पंधरा वर्षे पूर्ण झाली. त्या हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच एका कॉलने मुंबई पुन्हा हादरली. २६/११ च्या रात्री मुंबईत आतंकवादी घुसल्याचा कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आल्याने एकच खळबळ उडाली. अखेर त्या कॉलरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मानखुर्द पोलीस चौकी एकता नगर मध्ये २-३ आतंकवादी आल्याची माहिती कॉलरने दिली. मात्र त्यांची भाषा मला समजत नाही. पण त्यांचं काहीतरी प्लानिंग सुरू आहे असे सांगत कॉल करणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना सतर्क केले. तसेच त्यांच्याकडे काही बॅगा असल्याचेही त्या व्यक्तीने नमूद केलं. मात्र या कॉलनंतर त्याने फोन बंद केला होता. या कॉलची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिस आणि क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तपासाला सुरूवात केली.
अखेर पोलिसांनी कॉल करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे. किशोर ननावरे असं त्याचं नाव असून त्याने दारूच्या नशेत हा कॉल केल्याचं स्पष्ट झालं. ननावके हा विजय बार येथून दारू पिऊन घरी जात असताना, एका इसमाने फोन करण्याकरिता त्याचा मोबाईल मागितला होता, सदर इसमाने कोणाला फोन लावला हे माहित नाही असा दावा ननावरे याने केला. पोलिस त्याच्या वक्तव्याची पडताळणी करत असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील चेक करण्यात येणार आहेत.
यापूर्वीही आला होता धमकीचा कॉल
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलीसांच्या कंट्रोल रूमला असाच एक धमकीचा फोन आला होता. मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी कॉल करणाऱ्या व्यक्तीने दिली. यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर असून हा फोन नेमका कुठून आला, तो कोणी केला याचा तपास पोलिसांतर्फे करण्यात आला.
मिळालेल्या माहिनीनुसार, मुंबई पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा हा फोन आला. समा नावाची एक महिला एका काश्मिरी तरुणीच्या संपर्कात आहे, अशी माहिती या फोनकॉल वरून देण्यात आली. तसेच ते दोघेही मिळून मुंबईत मोठा घातपात करण्याच्या तयारीत आहेत, असेही फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना सांगितलं. एवढंच नव्हे तर एटीएसचे अधिकारी मला ओळखतात पण ही माहिती मी तुम्हाला देतोय असेही फोनवरून सांगण्यात आलं.