आर्यन खानचा जेलचा मुक्काम का वाढतोय? कोर्टात आज काय-काय घडलं?

| Updated on: Oct 14, 2021 | 5:47 PM

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी अजून संपताना दिसत नाहीत. कारण कोर्टानं आर्यन खानच्या जामीनावरचा निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवलाय.

आर्यन खानचा जेलचा मुक्काम का वाढतोय? कोर्टात आज काय-काय घडलं?
आर्यन खान
Follow us on

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी अजून संपताना दिसत नाहीत. कारण कोर्टानं आर्यन खानच्या जामीनावरचा निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवलाय. त्यामुळे पुढचे 6 दिवस आर्यन खानला जेलमध्येच काढावे लागतील. आर्यनच्या जामिनावरचा निर्णय आता 20 ऑक्टोबरला होईल. आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्या प्रकरणाच्या सुनावणीवर कोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे.

आर्यनच्या जामिनाचा आता थेट 20 ऑक्टोबरलाच निकाल का?

आर्यन खानसह इतर आठ आरोपींच्या जामीन अर्जावर आज सकाळपासून सुनावणी सुरु होती. या सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. पण कोर्टाने याबाबतचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे आर्यनसह इतर आरोपी न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत. एनसीबीच्या वकिलांचा आज एक वाजेपासून युक्तीवाद सुरु होता. लंच ब्रेकनंतरही त्यांचा युक्तीवाद सुरु होता. आरोपींच्या वकिलांनी सुद्धा युक्तीवाद केला. पण या प्रकरणाचा निकाल 20 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. कारण पुढील पाच दिवस दसरा आणि इतर शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे सुनावणीचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. विशेष म्हणजे कालपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. त्यामुळे आर्यनसह इतर आरोपींना आज दिलासा मिळेल, अशी चर्चा होती. पण आता पुढचे पाच दिवस आरोपींना जेलमध्येच राहावं लागेल.

काल आरोपींच्या वकिलांचा, आज एनसीबीच्या अनिल सिंग यांचा युक्तीवाद

कोर्टात आज दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. पण या युक्तीवादावर कोर्टाकडून कोणतीही कमेंट दिली गेली नाही. आरोपी आणि एनसीबीच्या वकिलांचं काय म्हणणं होतं या सगळ्यांचा तपशील कोर्ट ठेवतं. त्यानंतर निकाल जाहीर केला जातो. पण तसा घटनाक्रम आज घडला नाही. आज फक्त दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाला. हा युक्तीवाद कालपासून सुरु आहे. काल आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तीनही आरोपींनी युक्तीवाद केला होता. त्यामुळे एनसीबीचे वकील अनिल सिंग यांना युक्तीवाद करण्यासाठी फार थोडा वेळ मिळाला होता. त्यामुळे आज दुपारी एक वाजेपासून एनसीबीचे वकील अनिल सिंग एनसीबीची बाजू मांडत होते. त्यांनी बाजू मांडल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने त्यावर कोणतीही टिप्पणी केली नाही. कोर्टाने याबाबतचा निकाल राखून ठेवत 20 ऑक्टोबरला तो जाहीर केला जाईल, असं सांगितलं.

एनसीबीच्या वकिलांचा युक्तीवाद काय?

“आर्यन खान आणि अरबाजने ड्रग्ज घेतलं होतं. आर्यन आणि आरबाजविरोधात ठोस पुरावे आहेत. त्यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याने जामीन देऊ नये. ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी एकमेकांशी संबंधित आहेत. तसेच या ड्रग्ज प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे. त्यामुळे कोठडी वाढवून द्या. आर्यन, अरबाजच्या चौकशीतून मोठा कट उघड होईल”, अशी भूमिका एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी मांडली.

आर्यनचे वकील अमित देसाई यांचा युक्तीवाद नेमका काय?

ड्रग्ज पेडलर आणि आर्यन खान यांचा काहीच संबंध नाही. ड्रग्ज पेडलर्ससोबत आर्यनचा संबंधच नसेल तर कट कसला? असा सवाल आर्यनची बाजू मांडणारे वकील अमित देसाई यांनी कोर्टात केला. ड्रग्ज पेडलर अब्दुल कादिरकडे ड्रग्ज सापडलं. एनसीबी अब्दुल कादिरचा आर्यनशी संबंध जोडतंय. आर्यनचा ड्रग्ज संबंध अजूनही उघड न झाल्याने त्याला जामीन मिळावा, असा युक्तीवाद करत त्यांनी मागणी केली.

आर्यन खानचा मुक्काम कोठडीत कसा वाढत गेला ?

2 ऑक्टोबर- आर्यन खानला अटक, एक दिवसाची कोठडी

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तसेच इतर सात आरोपींना अटक करण्यात आले. यामध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट तसेच मॉडेल मूनमून धमेचा यांचा समावेश होता. त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना सुरुवातीला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती.

4 ऑक्टोबर- तीन दिवसांची एनसीबी कोठडी

एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर आर्यन खानला 4 ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर आर्यन खान तसेच त्याच्या इतर साथीदारांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. या कालावधीत एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली होती.

 7 ऑक्टोबर- 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी

तीन दिवसांची एनसीबी कोठडीचा कालावधी संपल्यानंतर न्यायालयाने आर्यन खानसह इतर सात आरोपींना  7 ऑक्टोबर रोजी तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली होती. आर्यन खानच्या बाजूने अॅड मानेशिंदे यांनी बाजू मांडली होती. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला होता.

14 ऑक्टोबर- न्यायालयाने निकाल राखून ठेवला

आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी आर्यन खान, मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना एनडीपीएस मुंबई कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

हेही वाचा : आर्यन खानचा मुक्काम कोठडीतच ! न्यायालयाने निकाल राखून ठेवला, 20 ऑक्टोबरला निर्णय