
Crime News: नागपूरमधून सोने व्यापाऱ्याची फसवणुकीचे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. दोन कोटी तीस लाख रुपयांची फसवणूक ज्वेलर्स दुकानाची करण्यात आली आहे. तीन किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने घेऊन बोगस चेक देत ही फसवणूक केली आहे. या प्रकरणातील आरोपीने इतर व्यापाऱ्यांची या पद्धतीने फसवणूक केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर येथील संभाजी चौकात श्री सप्तश्रृंगी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मालक जयंत वसंतराव पालकर आहेत. त्यांच्याकडे राहुल खाबिया आले. त्याने त्यांच्याकडून सोन्याचे दागिने घेतले. सुरुवातीला राहुल खाबिया याने रोख रकमेने व्यवहार सुरु केला. हळहळू त्याने पालकर यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्यासाठी धनादेश (चेक) वापर सुरु केला. तो नेहमी सोन्याची खरेदी करुन चेकने रक्कम देवू लागला.
राहुल खाबिया याने श्री सप्तश्रृंगी ज्वेलर्सकडून तीन किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने खरेदी केले. 2 कोटी 30 लाखांचे हे दागिने होते. त्या बदल्यात त्याने चेक दिले. ते चेक बँकेत पाठवल्यावर ते परत आले. ते चेक बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकारात फिर्यादी जयंत वसंतराव पालकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात नागपूर पोलिसांनी प्राथमिक तपास केला. त्यात असे आढळून आले आहे की, राहुल खाबिया याने इतर काही सोने व्यापाऱ्यांचीही या पद्धतीने फसवणूक केली आहे. सध्या आरोपी फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके पाठवली आहेत.
खाबिया याने प्रतापनगर आणि अंबाझरी पोलीस ठाणे परिसरात असलेल्या ज्वेलर्सची कोट्यवधीमध्ये फसवणूक केली आहे. त्याच्याकडून पैसे मागितल्यावर गुंडांच्या नावाने तो धमकी देत असतो. त्याने जीएसटी विभागालीह कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे.