Video | पोलीस पाटील आशा मोरे थेट रेती चोरणाऱ्यांशी भिडल्या, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 15, 2021 | 4:34 PM

पोलीस पाटलाच्या कामात अडथळा आणल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याचा पहिला गुन्हा नांदेडमध्ये दाखल झालाय. Nanded Mahur Police Patil

Video | पोलीस पाटील आशा मोरे थेट रेती चोरणाऱ्यांशी भिडल्या, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?
पोलीस पाटील आणि ट्रॅक्टर चालकामध्ये वाद
Follow us on

नांदेड: पोलीस पाटलाच्या कामात अडथळा आणल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याचा पहिला गुन्हा नांदेडमध्ये दाखल झालाय. पोलीस पाटील यांना सरकारने नुकताच सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला असून त्या अंतर्गत पहिलाच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात दाखल झालाय. वाई बाजार गावात हा प्रकार घडला. (Nanded Mahur first crime register under to intervention in the work of Police Patil)

नेमकं प्रकरण काय?

वाई बाजार गावातील महिला पोलीस पाटील आशा मोरे यांनी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडवून त्याची तपासणी केली. आशा मोरे यांनी ट्रॅक्टरची तपासणी केली, तेव्हा त्यात चोरीची रेती असल्याचे उघड झाले. पोलीस पाटील यांनी अडवल्यानं संतप्त झालेल्या ट्रॅक्टर चालकाने पोलीस पाटील यांच्याशी हुज्जत घालत वाद घातला. इतकेच नाही तर महिला पोलीस पाटील आशा मोरे यांना मारहाण ही केली. त्यानंतर पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलीस पाटील यांना सकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा

राज्य सरकारनं पोलीस पाटील यांना नुकताच सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला होता. पोलीस पाटलांना कलम 353 चे संरक्षण दिले होते. त्यामुळे पोलीस पाटील यांच्या कामकाजामध्ये अडथळा आणल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार करता येणार आहे. राज्यातील पोलीस पाटील संघटनेकडून त्याबाबतची मागणी बऱ्याच दिवसांपासून करण्यात आली होती.

पोलीस पाटील पद कसं निर्माण झालं?

महाराष्ट्रात इंग्रज काळापूर्वी खेडेगावात करवसुली आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं कामं वतनदार, जमीनदार पाटील आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या रामोशी, भिल्ल आणि जागल्या यांच्याकडे असायचे. ब्रिटीश काळात मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1867 नुसार गाव पोलीसांचे अधिकार निर्माण करण्यात आले. त्या कायद्यानुसार हे पद वंशपरंपरागत होते. स्वातंत्र्यानंतर वंशपरंपरा बंद झाली. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अंमलात आला.

पोलीस पाटलांची जबाबदारी

गावात होणाऱ्या संभाव्य शांतता भंग, गुन्हे चोरी, याबाबत पोलीस पाटलांनी सतर्क राहावे लागते. माहिती गोळा करुन संबंधित यंत्रणेला देणे. महसूल आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठांच्या मागणीप्रमाणं माहिती देणे. गावातील समुदायांची माहिती देणे. पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे. पोलीस अधिकारी, दंडाधिकारी यांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे. शासनाच्या आदेशाचे पालन करणे.

पोलीस पाटील यांची निवड करण्यासाठी 2014 पासून लेखी परीक्षा आणि तोंडीपरीक्षा घेण्यात येते आणि त्यांची नेमणूक होते.

संबंधित बातम्या:

राजकीय षडयंत्रातूनच खंडणीचा गुन्हा दाखल; गिरीश महाजन यांनी आरोप फेटाळले

सावधन, वॅक्सिन रजिस्ट्रेशनच्या नावावर लागू शकतो चुना !

चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा द्यावी लागलेल्या पीडितेची तक्रार, 2 आरोपींवर बलात्काराचा गुन्हा

(Nanded Mahur first crime register under to intervention in the work of Police Patil)