
देशातील विविध भागात गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांनी आपल्या पतीची हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या सोनम रघुवंशी प्रकरण देशभरात चर्चेत असताना नाशिकमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने खास योजना बनवून पतीचा खून केला आणि त्याच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावली. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथील यशवंत मोहन ठाकरे यांचा त्यांची पत्नी प्रभा हिने कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालत हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी प्रभाने पतीची हत्या केल्यानंतर त्याचे तुकडे केले आणि ते तुकडे गोणीत भरले आणि ते शोष खड्ड्यात पुरले.
मृत यशवंत मोहन ठाकरे हे गुजरातमध्ये मजूरीला गेल्याचे त्याच्या पालकांना वाटत होते, मात्र यशवंत दोन महिन्यांनंतर परत न आल्याने आई-वडीलांनी सून प्रभाकडे चौकशी केली, मात्र तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर पालकांनी चौकशी सुरु ठेवली पण त्यांना यशवंत सापडले नाहीत.
काही दिवसानंतर यशवंत याच्या भावाची बायको ही यशवंतची पत्नी प्रभा हिला भेटायला आली. त्यावेळी तिला काही संशयास्पद गोष्टी दिसून आल्या. याबाबत तिने आपल्या नवऱ्याला माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.
पोलिसांनी प्रभाला कुटुंबियांच्या तक्रारीवरून ताब्यात घेतले आणि तिची कसून चौकशी केली. मात्र सुरुवातीला तिने खोट्या गोष्टी सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आणखी सखोल चौकशी केल्यानंतर तिने पतीची हत्या केल्याची कबूली दिली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर घरातील शोशखड्यात यशवंतचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गोणी मधील तुकडे केलेला मृतदेह ताब्यात घेतला आहे.
पतीची हत्या का केली यावर बोलताना प्रभाने सांगितले की, पती मला दररोज दारू पिऊन मारहाण करायचा. मी बरेच दिवस गप्प होती, मात्र रोजच्या मारहाणीला कंटाळून मी कुऱ्हाड उचलली आणि यशवंतच्या डोक्यावर वार केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मी मृतदेह एका खड्ड्यात टाकून मातीने झाकला. दरम्यान, या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास सुरगाणा पोलिस करत आहेत.