Nashik|पाचवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; महिन्यातील दुसरी घटना, नेमके कारण काय?

| Updated on: Jan 02, 2022 | 9:42 AM

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याची नाशिक जिल्ह्यातील महिन्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Nashik|पाचवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; महिन्यातील दुसरी घटना, नेमके कारण काय?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नाशिकः सुरगाणा तालुक्यातल्या आश्रमशाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने पहाटे पाचच्या सुमारास आश्रमशाळेच्या निवासस्थानासमोर असलेल्या ओट्यावरील लोखंडी रॉडला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. या घटनेने विद्यार्थी आणि शिक्षकही हादरले आहेत.

भीषण दृश्य

सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील आश्रमशाळेत ही मुलगी शिकायची. मात्र, शाळेत तिला करमायचे नाही. शिवाय ही निवासी आश्रमशाळा आहे. त्यामुळे आई-वडिलांना सोडून तिला इथे रहावे लागायचे. तिला घराची सतत आठवण यायची. याच विचारात ती असायची. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अवघ्या बारा वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याने जिल्हा हादरला आहे. शिवाय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तिने लोखंडी रॉडला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. सकाळी-सकाळी आश्रमशाळेच्या निवासस्थानासमोर हे भीषण दृश्य पाहून अनेकजण भेदरून गेले.

महिन्यातील दुसरी घटना

नाशिक जिल्ह्यातील महिन्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या हर्सूल जवळच्या बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीने 12 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाची ही राज्यात स्थापन झालेली पहिली आश्रम शाळा आहे. तिने रविवारी दुपारी आत्महत्या केली. खरे तर या दिवशी शाळेला सुट्टी होती. तिच्या सर्व मैत्रिणी आणि इतर विद्यार्थिनी जेवणासाठी निघाल्या होत्या. मात्र, ती त्यांच्यासोबत गेली नाही. तिने मैत्रिणीला आपल्यासाठी डबा घेऊन ये, असा निरोप दिला. त्यानंतर पंख्याला ओढणी लावून गळफास घेतला. तिच्या मैत्रिणी जेवण करून आणि तिच्यासाठी डबा घेऊन आल्या. तेव्हा तिने दरवाजा उघडला नाही.

आत्महत्येचे कारण काय?

दोन्ही विद्यार्थिनी अभ्यासात हुशार होती. मात्र, त्यातील एकीचे खडकओहोळ हे गाव बोरीपाडा आश्रमशाळेपासून आठ किलोमीटर दूर होते. त्यात शाळा सुरू झाल्या आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संपही. त्यामुळे तिची शाळा बुडत होती. तिचे आई-वडील शेतमजूर आहेत. लेकीला रोज शाळेत सोडण्यासाठी त्यांच्याकडे वाहन नव्हते. त्यामुळे तिचा अभ्यास बुडू म्हणून त्यांनी तिला या आश्रमशाळेच्या वसतिगृहात ठेवले होते. तिच्या शिक्षकांनाही तिच्या प्रगतीचे कौतुक होते. तिला अभ्यासाचे कसलेही टेन्शन नव्हते. मग तिच्या आत्महत्येचे नेमके कारण काय होते, ते अजून समजलेले नाही. तसेच दुसऱ्या विद्यार्थिनीचे आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अजून तरी समजले नाही.

इतर बातम्याः

अस्पृश्यता निवारणाचे शिलेदार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अफाट कार्याचे स्मृतिदिनी स्मरण!

Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 573 वर; जिल्ह्यात 8 दिवसांत 9 मृत्यू