Nashik Crime: डॉ. नीलेश जेजुरकरांना सर्वोच्च झटका, पत्नीच्या गूढ मृत्यूप्रकरणी अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात

Dr Nilesh Jejurkar arrest: नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. नीलेश जेजूरकर यांना सर्वोच्च झटका बसला. पत्नी डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Nashik Crime: डॉ. नीलेश जेजुरकरांना सर्वोच्च झटका, पत्नीच्या गूढ मृत्यूप्रकरणी अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात
डॉ. नीलेश जेजुरकर
| Edited By: | Updated on: Sep 19, 2026 | 10:01 AM

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या गूढ मृत्यूने नाशिक जिल्हा हादरला. त्यांचे पती आणि जिल्हा रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांना याप्रकरणात पोलिसांनी अटक केली. अटक टाळण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शरण न आल्याने पोलिसांकडून अटक

मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जेजूरकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तर पोलिसांसमोर शरण येण्याचे निर्देश दिले. शरण न आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुंबई नाका-द्वारका परिसरातून गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

डॉ. मनीषा यांच्या मृत्यूचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. घटनेपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाला होता का? घटनेवेळी घरात नेमकं कोण होतं? मृत्यूची परिस्थिती काय होती, याची चौकशी करण्यात येत आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर डॉ. नीलेश जेजूरकर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

आतापर्यंतचा घटनाक्रम

डॉ. मनीषा जेजूरकर यांनी 6 मार्च 2026 रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर येथील निवासस्थानी गळफास घेत आत्महत्या केली होती. सुरुवातीला याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर 8 मार्च रोजी त्यांच्या बहिणीने डॉ. जेजूरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदवली होती. पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधातून मनीषा यांचा अनेक वर्षांपासून छळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 5 मार्च रोजी कौटुंबिक विवाह सोहळ्यात डॉ. जेजूरकर यांनी त्यांचा अपमान केल्याचा दावाही बहिणीने केला होता. तर कौटुंबिक छायाचित्रात मनीषा यांच्यासोबत उभं राहण्यास जेजूरकर यांनी नकार दिल्याचा त्यांचा आरोप होता.

तक्रारदार रोहिणी थोरात यांच्यावतीने ॲड. अभयसिंह भोसले यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात डॉ. जेजूरकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने प्रथमदर्शनी डॉ. जेजूरकर यांच्याविरुद्ध गुन्हेगारी हेतू आणि मानसिक छळाचा पुरावा दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us