हातात कोयते घेऊन येतात, शिवीगाळ करतात; संताप अनावर झाल्यावर रस्त्यावर कोयते आपटतात, भयावह दृश्य पाहून नाशिक हादरलं

पुणे शहारा पाठोपाठ नाशिकमध्येही कोयता गॅंग सक्रिय झाली आहे. नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचेव वातावरण निर्माण झाले आहे.

हातात कोयते घेऊन येतात, शिवीगाळ करतात; संताप अनावर झाल्यावर रस्त्यावर कोयते आपटतात, भयावह दृश्य पाहून नाशिक हादरलं
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 21, 2023 | 10:50 AM

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेगारी काही थांबायचे नाव घेत नाहीये. पुणे येथून सुरू झालेला कोयता गॅंगचा पॅटर्न नाशिकमध्ये मुक्काम ठोकून आहे. रविवारी दुपारी कार्बन नाका परिसरात अक्षरशः चित्रपटाला लाजवेल अशा प्रकारचा थरार समोर असतांना सिडको परिसरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नाशिकमधील सिडको येथील दत्त चौक परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील हा व्हिडिओ आहे. हातात कोयता घेऊन जोरजोरात शिवीगाळ करत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. फोनवर कुणाशी तरी संवाद साधत असतांना यामधील एक तरुण रस्त्यावर कोयता आपटतांना व्हिडिओत दिसून येत आहे.

यापूर्वीही नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करतांनाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. काही ठिकाणी तर घरांवर दगडफेक करत असतांनाचे व्हिडिओ समोर आले होते.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी अक्षरशः पोलिस अपयशी ठरत आहे. भर रस्त्यात टवाळखोर दहशत माजवत आहे. यामध्ये नागरिकांनी पोलिसांना अनेकदा तक्रारी करूनही त्यामध्ये काही बदल होत आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नाहीये. त्यामध्ये गुन्हेगार ठिकठिकाणी कोयता घेऊन हैदोस घालत असल्याने कोयता गॅंगची दहशत नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

मागील आठवड्यात पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही हातात कोयते बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्यात आली होती. त्यांना काही तासांपूर्वी पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. नाशिक शहरात पुण्याप्रमाणेच कोयता गॅंग सक्रिय होत असून पोलिसांना आव्हान देत आहे.

नाशिकच्या अंबड येथील व्हायरल झालेला व्हिडिओ पाहता नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून पोलिसांचा धाक शहरात राहिला नाही का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शहरात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.