गाडी विक्रीसाठी ऑनलाईन जाहिरात केली, ट्रायलसाठी तरुणाचा कॉल आला, गाडीही पसंत पडली पण नंतर…

| Updated on: Apr 14, 2023 | 4:23 PM

नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली चौकात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अंबड पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून अधिकचा तपास सुरू केला आहे.

गाडी विक्रीसाठी ऑनलाईन जाहिरात केली, ट्रायलसाठी तरुणाचा कॉल आला, गाडीही पसंत पडली पण नंतर...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात एका दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खरंतर अनेकदा एखादी जुनी वस्तु विक्री करायची असल्यास ऑनलाईन साईटचा वापर केला जातो. त्याच दरम्यान अनेकांची फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे. परंतु नाशिक मधील अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली चौकात धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. सिडको येथील प्रशांत जगताप या तरुणाने दुचाकी विक्री करायची म्हणून सोशल मीडिया आणि ऑनलाईन ॲपवर गाडीचे फोटो आणि माहिती भरली होती. त्यानंतर काही ग्राहकांनी फोटो पाहून पसंती दर्शवली आणि त्यानंतर प्रत्यक्ष भेट घेत दुचाकी पाहिली होती.

असाच प्रकार काही दिवसांपासून सुरू होता. त्यानंतर बुधवारी एका संशयित तरुणाने प्रशांत जगताप यांना फोन केला. गाडीबद्दल माहिती विचारली आणि गाडी बघायची म्हणून शुभम पार्क जवळ बोलविले होते.

संशयित तरुणाने गाडी चहू बाजूने पाहिली, त्यानंतर त्याने व्यवहार करण्यास सुरुवात केली. मात्र, याच वेळी गाडी आवडली असून ट्रायल घेतो म्हणून प्रशांत जगताप याला सांगितलं आणि गाडीवर बसला आणि जसा तिथून निघून गेला तसा परत आलाच नाही.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर प्रशांत जगताप यांनी ज्या क्रमांकावरुन फोन आला त्यावर संपर्क केला असता त्यावर संपर्क झालाच नाही. यामध्ये हा संपूर्ण प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधीच्या एका कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यावरून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिस संशयिताचा शोध घेत आहे.