
कल्याण | 11 सप्टेंबर 2023 : कल्याण व डोंबिवली या शहरांत गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली असून अनेक जण या नशेच्या आहारी गेल्याचेही समोर आले. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कंबर कसत नाकाबंदी सुरू केली आणि
त्याविरोधात धडक कारवाई सुरू केली. कल्याण कोळसेवाडी आणि खडकपाडा येथील पोलिसांनी एकाच दिवशी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचे ड्रग्स (drugs seized) जप्त केले तसेच या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक करण्यात (four arrested) त्यांना यश मिळाले.
कल्याण झोन 3 पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत कारवाई सुरू केली होती. तेव्हाच कल्याण पूर्व येथील १०० फूटी रोडवर नाकाबंदी सुरू असतानाच समोर पोलिसांना पाहूनही एक रिक्षा जोरात पळवली गेली. हे पाहून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या रिक्षाचा पाठलाग करत ती रोखली. त्या रिक्षातील दोन तरूणांना खाली उतरवून त्यांची झडती घेण्यात आली असता, त्यांच्याकडे ५.६ ग्राम वजन असलेला, सुमारे ३३, ६०० रुपये किमतीचा मादक पदार्थ सापडला. त्यांना पोलिसांनी अटक केली.
कुठून मिळाले अमली पदार्थ ?
त्या तरूणांची कसून चौकशी करण्यात आली असता मोठी माहिती समोर आली. नवी मुंबईतील इमेका या ४२ वर्षीय व्यक्तीकडून हा अमली पदार्थ खरेदी केला असून कल्याण पूर्वेत त्याची विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसा कोळसेवाडी पोलिसांनी नवी मुंबईतील वाशी परिसरातून सदर नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून २७९ ग्राम वजन असलेले सुमारे ५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा एम डी हा अमली पदार्थही जप्त करण्यात आला. या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तेव्हाच खडकपाडा पोलिसानी आंबीवली परिसरात एक कारवाई केली, तेथेही एका या महिलेकडून त्यांनी ३४ ग्राम एम डी जप्त केले. त्यांनी जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजारातील किंमत ६८ हजार रुपये इतकी होती. कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ७ लाखांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कल्याणात प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.