पुण्यातील विवाहितेची अल्पवयीन लेकीसह आत्महत्या, 29 वर्षांनंतर पतीला तुरुंगवास

| Updated on: Dec 26, 2021 | 2:00 PM

नवरा, सासू सासरे आणि भारती आपल्याला त्रास देत आहेत, असं जनाबाईने आपल्या आई वडिलांना सांगितलं. त्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी या प्रकरणात हस्तक्षेप केला, मात्र त्यात फारसा बदल घडला नाही. अखेर 9 ऑक्टोबर 1992 रोजी जनाबाईने तिच्या अल्पवयीन मुलीसह विहिरीत उडी मारुन जीव दिला.

पुण्यातील विवाहितेची अल्पवयीन लेकीसह आत्महत्या, 29 वर्षांनंतर पतीला तुरुंगवास
निवडणुकीत दिलेली आश्वासने न पाळणे हा गुन्हा नाही
Follow us on

मुंबई : पतीने केलेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच त्याच्या बाहेरख्याली वर्तनाला कंटाळून पुण्यातील विवाहितेने 29 वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीसह आत्महत्या केली होती. या प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने आरोपी नवऱ्याची तुरुंगात रवानगी केली आहे. आरोपी रामदास धोंडू कलातकर आणि भारती नामक महिलेच्या विरोधात मयत महिलेच्या भावाने तक्रार दाखल केली होती. आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याने केला होता. या प्रकरणी पुणे सत्र न्यायाधीशांनी आरोपींना दोषी सिद्ध करत कलातकरला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. तर भारतीला सहा महिन्यांचा साधा कारावास ठोठवण्यात आला होता. या निर्णयाविरोधात कलातकरने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

काय आहे प्रकरण?

जनाबाई दरेकर हिचा विवाह रामदास धोंडू कलातकर याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. पहिल्या मुलीचा अकस्मात मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर जनाबाई बाळंतपणासाठी काही दिवस माहेरी गेली होती. मात्र ती सासरी आली, तेव्हा नवरा भारती नावाच्या महिलेसोबत राहत असल्याचं तिला आढळलं.

विहिरीत उडी घेत आत्महत्या

नवरा, सासू सासरे आणि भारती आपल्याला त्रास देत आहेत, असं जनाबाईने काही दिवसांनी आपल्या आई वडिलांना सांगितलं. त्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी या प्रकरणात हस्तक्षेप केला, मात्र त्यात फारसा बदल घडला नाही. 9 ऑक्टोबर 1992 रोजी जनाबाईने तिच्या अल्पवयीन मुलीसह विहिरीत उडी मारुन जीव दिला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतक जनाबाईचा भाऊ भानुदास दरेकरने तिचा पती रामदास कलातकर, तिची सासू नखूबाई आणि भारती यांच्याविरोधात छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या कारवाईनंतर प्रकरण कोर्टात गेलं, तेव्हा तिघा आरोपींनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला. प्रकरण कोर्टात सुरु असतानाच सासू नखूबाईचा मृत्यू झाला.

तीन वर्षांचा सश्रम कारावास

पीडित पक्षाकडून कोर्टात सहा जणांची साक्ष घेण्यात आली. पुणे सेशन्स कोर्टाने साक्षीदारांचे जबाब आणि पुराव्यांच्या आधारे कलातकर आणि भारती यांना दोषी सिद्ध केले. कलातकरला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर भारतीला सहा महिन्यांचा साधा कारावास ठोठवण्यात आला होता

दोन्ही आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली. सुनावणी सुरु असतानाच भारतीचाही मृत्यू झाला. कनिष्ठ कोर्टाचा निर्णय, पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या जस्टिस अनुजा प्रभुदेसाई यांनी सांगितले, की “कलातकरने जनाबाईसोबत शारीरिक आणि मानसिक क्रौर्य केल्याचे रेकॉर्डवरील पुराव्यांमुळे सिद्ध होते. हा लहान-सहान गुन्हा नव्हता. आरोपीने सातत्याने गैरव्यवहार आणि अपमान केल्याने तिचं जगणं मुश्किल झालं होतं. त्यामुळे माहेरच्यांनी तिला घरी घेऊन जावं, हा एकच मार्ग तिच्यासमोर उरला होता”

कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

“महिला म्हणजे परक्याचं धन, ही समाजात समजूत आहे. तिचं खरं आयुष्य सासरीच आहे. महिलेला कुठल्याही परिस्थितीत सासरी सांभाळून घेण्याची शिकवण दिली जाते. मग तिला आयुष्यात कितीही संकटांचा सामना करावा लागू दे. जनाबाईकडे आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं, तिला सासरी कोणाचं पाठबळ नव्हतं. जनाबाईने रागाच्या भरात आत्महत्या केली नाही, तर मुलीला जन्म दिल्याबद्दल तिच्यासोबत झालेल्या अमानुष वर्तनाबद्दल तिने आयुष्याची अखेर केली. यापासून वाचण्यासाठी आणि मुलीला भविष्य नसल्याच्या जाणीवेतून तिने दोघींचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. यातून आरोपीचं क्रौर्य दिसतं. कलातकरने आपल्या वर्तनातून अशी परिस्थिती निर्माण केली, की जनाबाईकडे आत्महत्येशिवाय कुठलंच गत्यंतर उरलं नाही” असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.

संबंधित बातम्या :

आजोबांच्या श्राद्धाला बारबाला नाचवल्या, हवेत गोळीबार; एका नातवाला बेड्या, दुसरा पसार

मांडवलीसाठी नाशिकमध्ये उद्योजकाला मागितली 2 कोटींची खंडणी; भूमाफियाची तुरुंगातून उठाठेव

शिक्षकाची चोरीची ‘कला’, सोलापुरात Art Teacher पेट्रोल चोरताना रंगेहाथ