पुणे शहरातील शाळेत ख्रिश्चन समाजाची प्रार्थना, बजरंग दलाकडून प्राचार्यांना मारहाण

Pune Crime News : पुणे शहराजवळ असलेल्या एका शाळेतील प्राचार्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. शाळेत ख्रिश्चन धर्माची प्रार्थना विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली जात असल्याचा आरोप करत ही मारहाण झाली आहे.

पुणे शहरातील शाळेत ख्रिश्चन समाजाची प्रार्थना, बजरंग दलाकडून प्राचार्यांना मारहाण
| Updated on: Jul 06, 2023 | 2:45 PM

पुणे : पुणे शहराजवळील एका शाळेतील प्राचार्यांना मारहाण झाली आहे. तळेगाव भागातील आंबी येथील डी.वाय. पाटील शाळेच्या प्राचार्यांना मारहाण करण्यात आली. शाळेत ख्रिश्चन धर्माची प्रार्थना म्हटली जात असल्याचा आरोप करत ही मारहाण झाली. सुमारे १०० जणांच्या जमावाने ही मारहाण केली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.

काय आहेत प्राचार्यांवर आरोप

आंबी येथील डी वाय पाटील इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य अलेक्झांडर रीड यांना मारहाण झाली. शाळेत ख्रिश्चन धर्माची प्रार्थना म्हटली जात असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यात त्यांचा शर्ट फडला गेला. जमाव त्यांचा मागे धाव असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अजून काय आहे आरोप

प्राचार्यांनी विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे लावले, असा आणखी एक आरोपही बजरंग दलाकडून करण्यात आला. शाळेच्या प्राचार्यांचे नाव अलेक्झांडर कोट्स आहे. मावळ तालुक्यातील अंबी गावातील डी वाय पाटील स्कूलमध्ये ते प्राचार्य आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत सावंत यांनी सांगितले. शाळा प्रशासन किंवा प्राचार्यांकडून तक्रार दिली गेली नाही.

दरम्यान शाळेने प्राचार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.