
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे हिची सासू, सासरा आणि दीर आणि नणंद यांच्याविरोधात जानेवारी महिन्यातच गुन्हा दाखल करण्यात आला होता. हगवणे कुटंबाची मोठी सून मयुरी जगताप यांनी हगवणे कुटुंबाबाबत महिला आयोगात तक्रार दिली होती. मात्र तिथूनही कोणतीच कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे हगवणे कुटुंबीयांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला होता, असा खळबळजनक दावाही हगवणे कुटंबाची मोठी सून मयुरी हगवणे यांनी केला आहे.
जानेवारी 2022 मध्ये माझं सुशिल हगवणे यांच्यासोबत लग्न झालं होतं. माझी नणंद, दीर आणि सासू हे कायम मला त्रास देत होते. माझ्या सासूने माझे लाड केले तर तू तिचे लाड का करत आहेस? असं माझी नणंद माझ्या सासूला सांगायची. यात सर्वांत चांगली बाब म्हणजे या सर्व परिस्थितीत माझे पती माझ्यासोबत होते. ते माझ्या कायम पाठीशी होते. या सगळ्या गोष्टीत हगवणे कुटुंबाने त्यांच्या मुलालाही सोडलेलं नाही. माझ्या नवऱ्यालाही हगवणे कुटंबाने मारहाण केलेली आहे, असा खळबळजनक दावाही मयुरी जगताप केला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून आम्ही वेगळे राहात होतो. माझी नणंद आणि माझ्या दीराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे. माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर हात टाकलेला आहे. त्यानंतर आम्ही वेगळं राहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी तो यशस्वी होऊ दिला नाही, असाही खळबळजनक गौप्यस्फोट मयुरी जगताप यांनी केला.
वैष्णवी हगवणे हिने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल थोडीजरी माहिती दिली असती तरी मी तिची साथ दिली असती. मी त्या घरात हिम्मत दाखवली म्हणून मी आज जिवंत आहे. मी गप्प बसले असते तर मी आज तुमच्यासोबत नसते, असंही मयुरी जगताप यांनी म्हटलंय.
दरम्यान, या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवी हिची सून, नणंद, नवरा यांना अटक करण्यात आली आहे. तर सासरा, दीर हे फरार आहेत. त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.