Pune Crime : शंकर महाराज अंगात येतात , कौटुंबिक अडचणी दूर करतो सांगत दांपत्याला लुबाडलं, 14 कोटींचा फटका

पुण्यातील एका सुशिक्षित दांपत्याला मुलींच्या आजारपणाचा फायदा घेऊन कोट्यवधी रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'शंकर बाबा' अंगात येत असल्याचे भासवून महिलेने त्यांचे परदेशातील घर विकण्यास भाग पाडले, कर्ज काढायला लावले. मुली बऱ्या होतील या आशेने त्यांनी पैसे दिले, पण फसवणूक लक्षात येताच पोलिसांत धाव घेतली.

Pune Crime : शंकर महाराज अंगात येतात , कौटुंबिक अडचणी दूर करतो सांगत दांपत्याला लुबाडलं, 14 कोटींचा फटका
पुण्यात दांपत्याची कोट्यवधींची फसवणूक
Updated on: Nov 05, 2025 | 9:15 AM

पुण्यात एक सुशिक्षित दांपत्याच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा भयानक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. कौटुंबिक अडचणी दूर होतील या भूलथापांना बळी पडून १कुटुंबाने 14 कोटी रुपये गमावले, परदेशात असलेले घर विकायला लागलं. एवढंच नव्हे तर घर, शेतीवरही कर्ज काढावं लागलं. अंगातशंकर महाराज येतात, तुमच्या कौटुंबिक अडचणी दूर होतील असे सांगत पती पत्नी आणि इतरांनी पुण्यातील कुटुंबाची आर्थिक फसवणूक केली. अखेर त्यांच राहतं घर विकण्यासही त्यांना भाग पाडायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी घर विकण्यास विरोध केला. तेव्हा हा भयानक प्रकार उघड झाला. फसवणुकीचा हा प्रकार असल्याचे समजल्यावर आता या दांपत्याने पोलिसांकडे धाव घेतली.

नेमंक झालं तरी काय ?

याप्रकरणातील पीडित कुटुंबाने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रा अर्ज दिला. त्यातील माहितीनुसार, पीडित कुटुंबातील पती पत्नी हे एका खाजगी कंपनी मध्ये कामाला आहेत. त्यांना दोन मुली असून त्या दोघींनाही काही व्याधी आहेत, त्यामुळे त्या आजारी असतात. त्यातील एका मुलीला अलुपेशीया नावाचा रोग असल्याने तिला कमी प्रमाणात केस येतात. या दांपत्याला भजनाची आवड असल्याने ते अनेक ठिकाणी या कार्यक्रमासाठी जात असत. आणि त्याचवेळी त्या दोघांची दिपक जनार्दन खडके या व्यक्तीशी ओळख झाली

अंगात शंकर बाबा येतात असं भासवलं…

त्या दांपत्याच्या मुलीबाबत खडके यांना कळलं, तेव्हा त्यांनी त्या पती-पत्नीची ओळख वेदिका कुणाल पंढरपूरकर व कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली. “वेदिका या शंकर बाबाची लेक असून वेदिक च्या अंगात शंकर बाबा येतात ते तुमचे सर्व काम करून देतील तुमच्या मुलींचे आजार ठीक करतील तुम्ही निश्चिंत रहा” असं त्यांनी त्या दांपत्याला सांगितलं. त्यानंतर खडके यांच्या एका दरबारात, या दांपत्याला जेव्हा वेदिका भेटली तेव्हा तिने अंगात शंकर बाबा आल्याचं सांगितलं तसेच शंकर महाराजांची ॲक्टिंग करून स्वतः शंकर बाबा बोलत असल्याबाबत भासवलं.

उकळले कोट्यवधी रुपये

त्या दांपत्याकडे असलेली सर्व रक्कम माझ्याकडे द्या असं त्यांना सांगितलं. तुमच्या मुलीचा आजार गंभीर आहे, दोष जास्त आहेत असं म्हणत आजार बरा होण्यास बराच कालावधी लागेल असं सांगून त्या दोघांनी पीडित दांपत्याकडून करोडो रुपये उकळले.

परदेशातील घरंही विकायला लावलं

मात्र हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर वेदिका नामक महिलेने पुन्हा एकदा शंकर महाराज यांचा अभिनय करून घर विका, शेती विका आणि पैसे जमा करा असं त्या दांपत्याला सांगितली, त्यांची पुन्हा फसवणूक केली. आपल्या मुली बऱ्या होतील या अपेक्षेने त्या दांपत्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि परदेशातील घर सुद्धा विकलं आणि त्याचे पैसे या महिलेला दिले. त्या महिलेने दांपत्याची सर्व बचत, घराची रक्कम असे करत कोट्यवधी रुपये उकळले.

असा उघड झाला कट

मात्र त्यापुढे देविका नावाच्या महिलेने त्या दांपत्याला सुपारी, नारळ व दगड अशा वस्तू घरात ठेवण्यास सांगितल्या. शेवटचा पर्याय असल्याचे सांगून त्यांनी दांपत्याला राहते घर देखील विकायला सांगितलं. पण ते घरं एकमेव आसरा आहे असे सांगत त्यांनी घर विकण्यास नकार दिला. मात्र एवढं होऊन, आपल्या मुली बऱ्या होत नसल्याने गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या गोष्टी फसवणुकीचा हा प्रकार असल्याचं त्या दांपत्याला समजलं. अखरे या दांपत्याने पोलिसांकडे धाव घेतली आहे . आम्हाला खोटी माहिती देऊन, अंगात शंकर बाबा येतात असे भासवून आमचा विश्वास संपादन करून आम्हास खोट्या भूलथापा देऊन, आश्वासन देऊन आमच्या मिळकती विकण्यास सांगून सदरची त्यांचे खात्यामध्ये जमा करण्यास सांगून आमची 13 ते 14 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार या दांपत्याने केली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.